अकलूजमध्ये विजयदादांच्या नातवाचा शाही विवाह सोहळा,
शरद पवारांसह राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती, मात्र भाजप नेत्यांनी फिरवली पाठ
सोलापूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आणि भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये पार पडत आहे.
या विवाह सोहळ्यासाठी खासदार शरद पवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित आहेत.
याशिवाय क्रीडा राज्यमंत्री दत्तात्रय भरणेही उपस्थित आहे. मात्र, या विवाह सोहळ्याकडे भाजपच्या आमदार खासदार मंत्र्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
राजकारण, समाजकारण यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये पार पडत आहे. या सोहळ्यासाठी मोठी गर्दी अकलजूमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राजकारण, समाजकारण यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. या सोहळ्यात भगवी टोपी घालून विजयसिंह मोहिते पाटील मान्यवरांच्या सोबत उपस्थित आहेत.
दरम्यान, या सोहळ्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार खासदार मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
शुभ विवाह सोहळ्याची अकलूजमध्ये जय्यत तयारी
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीच्या शुभ विवाह सोहळ्याची अकलूजमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती, राजकीय,
सामाजिक, शैक्षणिक, सहकार, नाट्य, चित्रपट, उद्योग आदी क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. तसेच सुमारे दीड लाख निमंत्रित मित्र परिवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याची तक्रार त्यांच्या विरुद्ध भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती.
राम सातपुते यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिलं होतं.
दरम्यान, भाजप पक्षाचे एक हजार सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन केले होते.
0 Comments