सांगोला एसटी बस स्थानकाकडून वाढविण्यात आलेले नवीन दर पुढील प्रमाणे.....
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- एसटी ही गावगाड्यातील तसेच शहरातील ही सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. परंतु सांगोल्यातील जुन्या एसटी बसचे नवीन दर येथील प्रवाशांना परवडत नसल्याचे बोलले जात आहे.
परिणामी यात्रा काळात गाव गाड्यातून खाजगी वाहनांमधून देवदर्शनासाठी जाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जीप, पिक- अप, छोटा हत्ती, क्रुझर, छोट्या लक्झरी यासारख्या वाहनांना अधिक मागणी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगोला एसटी बस स्थानकात 52 एसटी बसेस आहेत. मागील सुमारे चार ते पाच वर्षापासून आगाराला नवीन बस मिळाली नाही.
बस स्थानकातील सध्या चालू स्थितीत असलेल्या बस मधूनच काही बस आता मर्यादा संपल्यामुळे कालबाह्य होणार आहेत.
तत्पूर्वी आहे या बसवर आगारातून प्रवाशांना ने आण केली जात आहे. परिणामी अनेकदा एसटी बसचा खोळंबा होतो. प्रवाशांना दुसरी बस उपलब्ध होईपर्यंत ताटकळत थांबावे लागते. हा प्रकार वारंवार घडत असताना,
यामध्येच एसटी महामंडळाकडून 29 जानेवारीपासून तिकिटामध्ये 15 टक्के दरवाढ लागू केली आहे. ही दरवाढ प्रवाशांना न परवडणारी असल्याने, प्रवाशांनी आता खाजगी वाहनांकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे.
भाडेवाढीचा सर्वाधिक परिणाम नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गावर होत आहे. त्याचबरोबर शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, गावाकडे जाणारे स्थलांतरित कामगार आणि पर्यटन व देवदर्शनासाठी प्रवास करणारे
नागरिक यांनाही या भाडेवाढीचा मोठा फटका बसत आहे. कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना जास्त खर्च करावा लागणार असून, विद्यार्थ्यांच्या पालकांवर अतिरिक्त आर्थिक ताण येत आहे.
यासह आगामी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना एसटी महामंडळाने तिकीट दरात 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी हंगामात एसटी प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते.
शालेय-महाविद्यालयीन सुट्या, कौटुंबिक भेटी, पर्यटन आणि देवदर्शन यांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. अशा परिस्थितीत भाडेवाढीचा निर्णय प्रवाशांसाठी अतिरिक्त आर्थिक बोजा ठरणार आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी काही सवलती व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत. मासिक पास धारकांना विशेष सवलत,
विद्यार्थी पास योजना, ज्येष्ठ नागरिक सवलत आणि विशेष सामूहिक प्रवास योजना या माध्यमातून प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
परंतु या सवलतींचा लाभ सर्व प्रवाशांना मिळेल असे नाही. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वाढीवदर परवडत नसल्याने खाजगी वाहनांचा पर्याय निवडला असल्याचे दिसून येत आहे.
सांगोला एसटी बस स्थानकाकडून वाढविण्यात आलेले नवीन दर पुढील प्रमाणे.....
सांगोला - पंढरपूर जुने दर 55 रू. नवीन दर 61 रू.
सांगोला - मंगळवेढा जुने दर 55 रू. नवीन दर 61 रू.
सांगोला - अकलूज जुने दर 90 रू. नवीन दर 102 रू.
सांगोला - सोलापूर (पंढरपूर मार्गे) जुने दर 160 रू. नवीन दर 182 रू.
सांगोला - सोलापूर (मंगळवेढा मार्गे) जुने दर 150 रू. नवीन दर 172 रू.
0 Comments