खळबळजनक..सांगोल्यात 'धनुष्यबाणा'ला रोखले 'मशाली'नेच रोखल्याची चर्चा
सांगोला : सांगोला मतदारसंघावर शेकापची पुन्हा सत्ता अबाधित राहिली आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे तरुण वयात आमदार म्हणून निवडून आले आहेत. माजी आमदार शहाजीबापू पाटील व दीपक साळुंखे-पाटील यांचा पराभव झाला आहे.
असे असले तरी जाहीर झालेल्या निकालावरून शहाजीबापूंचा पराभव दीपक साळुंखे-पाटील निवडणुकीत उतरल्याने झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सांगोल्यात 'धनुष्यबाणा'ला 'मशाली'नेच रोखल्याची चर्चा रंगत आहे.
सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापने आपला गड शाबूत ठेवला आहे. परंतु, राज्यात महायुतीचे बहुमताचे मजबूत सरकार आले आहे. अशावेळी विकासकामांच्या निधीसाठी
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना संघर्ष करावा लागणार आहे.राज्यात ज्या ज्यावेळी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी शहाजी पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते.
1995 ला भाजप-सेनेला अपक्षांनी साथ दिली, तर शहाजीबापू पाटील काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. 2019 ला ते शिवसेनेकडून निवडून आले होते. शिवसेनेच्या बंडात ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असला तरीही यावेळी शहाजीबापू पाटील पराभूत झाले.
शहाजी पाटील यांनी यंदाची ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले असले तरी ते राजकारणातून निवृत्त होणार नाहीत,
अशी चर्चा आहे. विकासकामांत नेहमीच सहकार्य करू, असे ते जाहीरपणे सांगतात. डॉ. बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी पाटील अशी दुरंगी लढत झाली असती तर कदाचित वेगळा निकाल लागू शकला असता. हाती आलेल्या निकालावरून दीपक साळुंखे यांना
पडलेल्या 51 हजार मतदानावरून शहाजीबापू यांच्याकडील जास्तीची मते त्यांनी आपल्याकडे खेचली आहेत. शेकापचीही मते वळविण्यात ते यशस्वी झाले. परंतु, याचा सर्वात जास्त फटका शहाजीबापू पाटील यांना बसला आहे.
म्हणजेच शहाजीबापूंच्या पराभवात दीपक साळुंखे यांची उमेदवारी असल्याने सिद्ध होत आहे. जर शहाजीबापू पाटील निवडून आले असते, तर तालुक्याला लाल दिव्याची गाडी मिळाली असती.
परंतु, त्यांच्या पराभवामुळे त्यांची संधी हुकली आहे. त्यामुळे शहाजीबापूंचे कार्यकर्ते त्यांच्या पराभवाबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत.शहाजीबापू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत.
त्यामुळे त्यांना निदान विधानपरिषद किंवा महामंडळही मिळू शकते, अशी चर्चा आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, याची प्रचिती अनेक वेळा आलेली आहे. आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो व आजचे मित्र उद्याचे विरोधक होऊ शकतात.
0 Comments