भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्यावतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या होणार्या सत्कारावर बहिष्कार
मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी होणार्या सत्कारावर सांगोला भिमनगर येथील बौध्द बांधवांचा बहिष्कार
सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला भिमनगर येथे आमदार शहाजीबापू पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतर्यास महाराष्ट्र शासनाकडून निधी मिळवून दिला होता.
त्यासाठी भिमनगर येथे आज मंगळवार दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी सत्कार करण्याचे आयोजन काही ठराविक दोन-तीन जणांनी केले होते. जयंती उत्सव मंडळाच्या कोणत्याही पदाधिकार्याला विश्वासात
न घेता किंवा संचालक बॉडीची मिटींग न घेता ठराविक दोन-तीन जणांनी आपल्या राजकीय स्वार्थापोटी सत्काराचे आयोजन केले होते. परंतु वर्तमानपत्रात बातमी वाचल्यानंतरच हे समाजबांधवांना समजले.
त्या अनुषंगाने भिमनगर येथील बौध्द बांधवांची दीक्षाभूमी कट्टयावर सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता बैठक होऊन सदरच्या सत्कार कार्यक्रमावर जयंती उत्सव मंडळ व बौध्द बांधव यांनी बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे.
सदरचा कार्यक्रम हा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ऑफिसमधून काही जातीयवादी त्यांच्या पक्षातील पदाधिकारी की ज्यांनी नेहमीच बौध्द समाजाला विरोध केला आहे,
गेल्या राम नवमी मिरवणुकीत ज्या व्यक्तींने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर फाडला व ज्यांच्यावर अॅट्रॉसिटीसह कायदेशीर कारवाई झाली असून त्या व्यक्तीची जेलवारी झाली आहे,
त्या व्यक्तीचे नाव आमदार शहाजीबापूंच्या कार्यालयातून मान्यवरांच्या यादीत नाव दिल्याने संतप्त समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता शहाजीबापू यांनी डॉ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास निधी
दिल्याबद्दल त्यांचा या अगोदर जयंती उत्सव मंडळ व भिमनगर सांगोला येथील बौध्द बांधवांनी तीन वेळा सत्कार घेण्यात आला होता. चौथ्यावेळी घेण्यातसुध्दा समाजाची काहीही हरकत नाही.
परंतु काही राजकीय संधीसाधू मंडळी समाजातले आम्हीच प्रमुख आहोत हे दाखवून देण्यासाठी असे कार्यक्रम घेतात. तरी भविषयात शहाजीबापू पाटील यांना तालुक्यातील आंबेडकरी समाजाची
सहानुभूती मिळवावयाची असेल तर त्यांनी असे कार्यक्रम स्वतःहून टाळावे व त्यांनी स्वतःतून आजचा कार्यक्रम रद्द करावा अन्यथा भविष्यात त्यांच्या राजकीय अस्तित्वास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरची माहिती भिमनगर येथील बौध्द बांधव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ (रजि.) सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली.
0 Comments