मोठी बातमी.. विधानसभा उमेदवारीवरून सांगोल्यात भाऊबंदकी; शेकापचे दोन्ही देशमुख इच्छूक!
आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघ महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा उमेदवारीरून सांगोल्यात पुन्हा भाऊबंदकी रंगण्याची चिन्हे आहेत.कारण सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख या दोघांचीही
दावेदारी कायम आहे. उमेदवारीचा वाद मिटविण्यासाठी या दोन्ही बंधूंनी शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे देशमुख बंधूंच्या वादावर काय तोडगा निघतो, याकडे सांगोला तालुक्याचे लक्ष असणार आहे.
सांगोला मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून शहाजी पाटील हे निवडून आले आहेत. शिवसेनेच्या बंडात एकनाथ शिंदे यांना साथ देत पाटील हे गुवाहाटीला गेले होते, त्यामुळे त्यांना महायुतीकडून शहाजी पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत मात्र सांगोला मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून सांगोल्यातून निवडणूक लढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख इच्छुक आहेत.
मागील 2019 मध्ये डॉ. अनिकेत देशमुख यांनी शहाजी पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती.
अगदी शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या डॉ. अनिकेत देशमुख यांनी शहाजी पाटील यांना चांगले झुंजवले होते. अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 768 मतांनी पराभव झाला होता.
आता तो पराभवाचा वचपा काढण्याची संधी शेतकरी कामगार पक्षाला मिळाली आहे. असे असले तरी शेतकरी कामगार पक्षातील दोन बंधूंमध्ये उमेदवारीवरून वाद सुरू आहे.
डॉ. अनिकेत देशमुख हे वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची धुरा सांभाळली. त्यांनी गेल्या पाच वर्षांत शेतकरी सूतगिरणी, सांगोला खरेदी-विक्री संघ, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती
आदींच्या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व मिळविले आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्येही शेकापने घवघवीत यश मिळवले आहे, त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाकडून सांगोल्याच्या उमेदवारीवर बाबासाहेब देशमुख यांचा दावा आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेची तयारी केली असतानाच डॉ. अनिकेत देशमुख यांनीही शेकापच्या उमेदवारीवर दावा केला आहे. विशेष म्हणजे अनिकेत देशमुख हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक होते.
त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा मागे घेत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता.
सांगोला विधानसभा उमेदवारीचा वाद मिटवण्यासाठी देशमुख बंधू हे शरद पवारांच्या कोर्टात गेले होते. विशेष म्हणजे पवारांना भेटायला जाताना हे दोन्ही बंधू एकाच गाडीतून गेले होते.
सांगोला मतदारसंघ आणि उमेदवारी यासंदर्भात त्यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा झालेली असू शकते. आता शरद पवार यांनी या दोन बंधूंच्या वादावर काय तोडगा काढला, हे लवकरच पुढे येईल.
0 Comments