पाटलांचा नाद खुळा..! 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची कालही बैठक संपन्न झाली, मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे, आता लवकरच आचारसंहिता जाहीर होईल.
पण, मराठा समाजाला आोबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
त्यातच, पहिल्यांच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे.
या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे.
या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे. नारायण गडाच्या एकूण 900 एकर क्षेत्रावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.
मेळाव्यासाठी येणाऱ्या बांधवांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यातील हिट लक्षात घेता पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील पहिल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलतील, आपली भूमिका जाहीर करतील का, राजकीय निर्णय घेतील का,
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मेळाव्यातून मिळणार आहेत. त्यामुळे, राज्यभरातून मराठा बांधव या मेळाव्याला उपस्थिती दर्शवणार आहेत.
100 रुग्णवाहिका
नारायण गडावर होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून ज्या सुविधा आयसीयु विभागात दिल्या जातात, त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत.
येथे येणाऱ्या बांधवांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणार आहे. तर, 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 200 एकरवर पार्किंकची व्यवस्था असणार आहे.
500 क्विंटल बुंदी
या मेळाव्यासाठी आतापर्यंत नारायणगडावर जवळपास 500 क्विंटल बुंदीचे गाळप महाप्रसाद स्वरूपात करण्यात आले आहे. दिवस-रात्र भाविकांसाठी मराठा सेवकांचे हात येथे झटत आहेत.
जेवणासह महाप्रसाद म्हणून बुंदी तयार केली जातेय. तर, गडाच्या परिसरात असणाऱ्या गावांमध्ये विशेष भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था टँकर आणि बाटल्यांमधून करण्यात आली आहे.
0 Comments