"स्वच्छ सांगोला, सुंदर सांगोला" च्या घोषणा व पेपरबाजी करून सांगोला शहर स्वच्छ होणार का? शहर वासियांचा सवाल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : शहरातील आठवडा बाजारच्या दक्षिण बाजूच्या गेट लगत थोडा पाऊस पडला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुट भर पाणी साचून दुकानदार,
बाजारकरू, शेतकरी, नागरिक यांना त्रास होत आहे, तसेच या ठिकाणी सार्वजनिक मुतारी आहे त्याचा मैला ही या पाण्यात मिश्रित होत
असल्याने दुर्गंधी येत असुन त्याने नागरिक, दुकानदार यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनास नागरिक,बाजारकरू व व्यापारी यांनी वारंवार सांगून देखील या ठिकाणचा पाण्याचा निचरा व्हावा
या करीता कोणतीच उपाययोजना केली गेली नसल्याने “माझी वसुंधरा अभियानाच्या नावाखाली स्वच्छ सांगोला, सुंदर सांगोला” अशा नुसत्याच घोषणा देऊन व पेपरबाजी करून सांगोला शहर स्वच्छ होणार का?
असा सवाल या निमित्ताने शहर वासीयातून विचारला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक भाजीपाला विकणारे शेतकरी, व्यापारी देखील बसत असल्याने व त्यात थोडा पाऊस पडला
तर लगत असलेल्या मुतारीचा मैला पाण्यामध्ये मिश्रित होऊन वाहत असल्याने बाजारकरु, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांगोला नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे
व या ठिकाणी कायमच पाऊस पडल्यानंतर पाणी निचरा होत नसल्याने यावर कायमचा रामबाण उपाय करावा अशी मागणी शहरवासिय बाजारकरू, शेतकरी व व्यापारी वर्गातून केली जात आहे.
मुळात सांगोला शहरातील अनेक भागात स्वच्छतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे याबाबत विचारणा केली
असता ते ठेकेदाराकडे बोट दाखवतात परंतु ठेकेदार हा कर्मचारी नाही आज करतो, उद्या करतो अशा प्रकारची उत्तरे देत
असल्याने सांगोला नगरपालिकेच्या “आरोग्य विभागाचे आरोग्यच धोक्यात” आल्याचे या निमित्ताने पहावयास मिळत आहे .सांगोला शहरातील अनेक भागांमध्ये घंटागाडी देखील कधी येते आणि कधी जाते
याचा देखील पत्ता लागत नसल्याचेही शहरवासीयातून बोलले जात आहे. घंटागाडीच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी असून घंटागाडी नागरिकांच्या सोयीसाठी असताना त्यामूळे गैरसोयीचं जास्त झाली आहे.
0 Comments