महत्त्वाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 'या' तीन महत्त्वाच्या पदांसाठी
नेमणूक करण्यात येणार; ग्रामसेवक पाठविणार पंचायत समितीला नावे
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहु-कौशल्यावर आधारित जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत गवंडी (प्लंबर),
मेकॅनिक फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नलजल मित्रांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.
दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळजोडणी द्वारे प्रति माणसी प्रति दिन ५५ लीटर विहित गुणवत्तेसह व दैनंदिन स्वरुपात पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
या योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे.
यासाठी लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या पूर्वनियोजन टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही.
अर्धकुशल मनुष्यबळाला प्रशिक्षण देणार
जिल्ह्यात शिखर समितीच्या मान्यतेनुसार प्रति ग्रामपंचायतीमधील अप्रशिक्षित, अर्धकुशल मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मल्टिस्किलिंग आर.पी.एल. मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संचासाठी प्लंबर (गवंडी), मोटार मेकॅनिक फिटर, व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी ग्रामपंचायतीमधील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.
ग्रामसेवक पाठविणार पंचायत समितीला नावे
ग्रामसेवकांनी प्रत्येक ट्रेडसाठी तीन उमेदवार सहभागी करून एकूण ९ नलजल मित्रांची गुणवत्ता यादी अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करायची आहे. त्यांचे फोटो व आधार कार्ड पंचायत समिती येथे सादर करावयाचे आहे.
त्यानंतर त्यांची प्रि-स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचासाठी एक ट्रेडसाठी एक उमेदवार प्रमाणे अंतिम ९ पैकी ३ उमेदवार निवडण्यात येणार आहेत.
पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत ३ नलजल मित्रांची नियुक्त्ती करण्यात येणार आहे.
यासाठी संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधितांनी तातडीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांशी संपर्क साधावा. तातडीने नावे पंचायत समिती स्तरावर पाठवावीत.- अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर..
0 Comments