आमचं ठरलंय ! वीस हजार जणांच्या उपस्थितीत अजितदादांचे 40 नेते शरद पवारांच्या
राष्ट्रवादीत जाणार? 'या' तारखेला होणार प्रवेश
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते
आपल्यासाठी सोयीची राजकीय वाट निवडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले
अनेक समर्थक लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कामगिरीमुळे शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले आहे.
त्यांचा स्ट्राइक रेट 80 टक्के राहिला आहे. यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन अनेक नेतेमंडळी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
रोज किमान दोन तास शरद पवार यांना पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या भेटीगाठीसाठी काढावे लागत असल्याचे खुद्द शरद पवार यांनीच सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मधून मोठ्या संख्येने माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड मधून मोठ्या प्रमाणात
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार पडणार हे जवळपास निश्चित झाले होते. पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.
याच पिंपरी चिंचवड मधून अजितदादांसोबत असलेले 40 नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार
असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी 20 जुलै हि तारीख निश्चित करण्यात आली आहे. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे.
20 जुलैच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून पण 20 हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांच्याकडे जाणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्याने
त्याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments