सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 'या' नेत्यांना मिळणार उमेदवारी?
बंडखोरी थोपविण्यासाठी नेत्यांचा निघणार घाम; 'महाविकास'कडून नवीन चेहऱ्यांनाच संधी
सोलापूर : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मित्र असलेले पक्ष आता एकमेकांचे विरोधक बनले आहेत.
त्यामुळे आता काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही आपल्याकडील काही जागा द्याव्या लागणार आहेत.
तर भाजप-शिवसेनेलाही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही जागा सोडाव्या लागतील. जागावाटपात पूर्वीच्या इच्छुकांना पुन्हा थांबावेच लागणार आहे.
अनेकांनी लोकसभा निवडणुकीतूनच विधानसभेची उमेदवारी फिक्स केल्याने ऐन विधानसभेपूर्वी बंडखोरीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी सांगोला, माळशिरस, करमाळा,
पंढरपूर-मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ या मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार निश्चित झाले आहेत.
'लोकसभा निवडणुकीत मदत करतो, पण विधानसभेला मलाच संधी मिळायला हवी' असे त्या उमेदवारांनी वरिष्ठ नेत्यांकडून वदवून घेतले आहे. त्यामुळे आता उमेदवारी मिळणार
नाही याची खात्री झालेले भावी आमदार पक्षांतर करून उमेदवारीसाठी वशिला लावू शकतात, असेही बोलले जात आहे. दुसरीकडे विधानसभेनंतर काही महिन्यातच महापालिका,
जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने पक्षातील नाराजांना त्याठिकाणी अध्यक्ष, सभापती करतो, अशी आश्वासने दिली जावू शकतात, अशीही चर्चा आहे.
मतदारसंघनिहाय प्रबळ दावेदार
मोहोळ : यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय क्षीरसागर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), रमेश कदम (पक्ष निश्चित नाही).
दक्षिण सोलापूर : सुभाष देशमुख (भाजप), दिलीप माने, महादेव कोगनुरे, चेतन नरोटे, सुरेश हसापुरे (काँग्रेस), अमर पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे).
अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (भाजप), सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस).
शहर उत्तर : विजयकुमार देशमुख (भाजप), महेश कोठे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार).
शहर मध्य : देवेंद्र कोठे (भाजप), शिवाजी सावंत (शिवसेना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट), बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, जुबेर कुरेशी, फिरदोस पटेल (काँग्रेस).
माळशिरस : राम सातपुते (भाजप), उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार).
करमाळा : संजय शिंदे (पक्ष निश्चित नाही), नारायण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार).
माढा : बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय कोकाटे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे).
सांगोला : शहाजी पाटील (शिवसेना), अनिकेत देशमुख (शेकाप).
बार्शी : राजेंद्र राऊत (भाजप पुरस्कृत), दिलीप सोपल (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे).
पंढरपूर-मंगळवेढा : समाधान आवताडे, प्रशांत परिचारक (भाजप), अभिजित पाटील (पक्ष निश्चित नाही), भगिरथ भालके.
'दक्षिण'मधून काडादींनाही मिळू शकते उमेदवारी दहा वर्षांपासून भाजपकडे असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला.
त्यांना दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढ्यातून मोठे मताधिक्य मिळाले. त्यांच्या विजयात ज्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला
त्यात धर्मराज काडादी यांचे नाव पहिल्या रांगेत आहे. या निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपविरोधात भूमिका घेतली होती. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता यावी,
यादृष्टीने प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार प्रबळ व तुल्यबळ असणार आहे. 'दक्षिण सोलापूर'मधील संभाव्य बंडखोरी थोपवून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी
काँग्रेसकडून काडादींना उमेदवारीसाठी आग्रह केला जावू शकतो. पण, ते निवडणूक लढणार की मदतनिसाच्याच भूमिकेत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदारसंघ वाटपावरून बंडखोरी वाढण्याची चिंता २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे मतदारसंघ फिक्स होते.
मात्र, आता मागील निवडणुकीतील विरोधी पक्ष आता मित्र झाल्याने कोणता मतदारसंघ कोणाला द्यायचा आणि अनेक इच्छुकांमधून उमेदवारी कोणाला द्यायची
हा तिढा सोडविताना नेत्यांचाच घाम निघणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा, मोहोळ या प्रमुख तीन मतदारसंघात अशी स्थिती आहे.
0 Comments