खुशखबर विद्यार्थ्यांनो, शैक्षणिक दाखल्यांची चिंता नको,
तुमच्याच गावात मिळतील दाखले ! जिल्हाधिकाऱ्यांची तालुकानिहाय विशेष मोहीम, सेतू सुविधा केंद्रेही सुरू
सोलापूर:- दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस बारावीनंतरच्या पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना विविध दाखल्यांमुळे अडचणी येऊ नयेत,
म्हणून प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कॅम्प घेतले जात आहेत.बार्शी, माढा, उत्तर सोलापूर तालुक्यानंतर आता मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा,
सांगोला, मंद्रूप, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये देखील १५ जूनपूर्वी कॅम्प होणार आहेत. विशेष म्हणजे सर्व कॅम्प मंडल स्तरावर होणार आहेत.
जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावात (मंडल स्तरावर) विशेष कॅम्प राबवून शैक्षणिक दाखले देण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांसाठी ही सोय करून देण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील कॅम्प १४ व १५ जूनला होईल.
तर अक्कलकोट तालुक्यातील कॅम्प ११ व १२ जूनला असणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील मंडलस्तरावर कॅम्प सुरू झाले असून, पुढील आठ दिवस ही मोहीम सुरू राहील,
असे तहसीलदार मदन जाधव यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. शैक्षणिक दाखला नसल्याने प्रवेश मिळाला नाही, अशी एकाही विद्यार्थ्यांची तक्रार येऊ नये, यासाठी हे कॅम्प राबविले जात आहेत.
प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडलात विशेष कॅम्प
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी दाखल्यांची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यात मंडल स्तरावर विशेष कॅम्प घेतले जात आहेत. सर्व तहसीलदारांना तसे निर्देश दिले असून,
बार्शी, उत्तर सोलापूर, माढा तालुक्यात कॅम्प राबविण्यास सुरवात झाली आहे. आता उर्वरित तालुक्यातही ते सुरू होतील. विद्यार्थ्यांनी त्याठिकाणी अर्ज करून दाखले काढून घ्यावेत.
- मनिषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
कॅम्पमध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसीचाही
तालुक्यांच्या मंडल स्तरावरील या विशेष कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव तयार करून त्याठिकाणी द्यावे लागतील.
'व्हीजेएनटी' प्रवर्गातील लाभार्थींनाही याठिकाणी दाखले दिले जातील. दुसरीकडे दुष्काळ अनुदान मिळालेले नाही किंवा प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी,
नमो शेतकरी महासन्मान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये मिळत नाहीत, त्या शेतकऱ्यांची ई- केवायसी देखील या कॅम्पमध्ये करून घेतली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र टेबल ठेवला जात आहे.
जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रे सुरू
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक सेतू सुविधा केंद्र आहे, पण मागील अनेक महिन्यांपासून सेतू केंद्रे बंद होती.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या पाठपुराव्यातून आता जिल्ह्यातील सर्वच सेतू सुविधा केंद्रे सुरू झाली आहेत. शहरी भागातील विद्यार्थ्यांना त्याठिकाणी दाखले मिळतील.
आता प्रवेशासाठी काही दिवसांचा अवधी राहिल्याने कोणत्याही दाखल्याचा कालावधी किती हे न पाहता तत्काळ दाखले द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
विविध दाखल्यांसाठी दक्षिण सोलापूरमध्येही शिबिर
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर यासह इतर शैक्षणिक दाखल्यांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत
दक्षिण सोलापूर तालुक्यात ११ ते १४ जून या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात केल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली. ११ व १२ जून रोजी एस. व्ही. सी. एस. प्रशाला, बोरामणी,
शंकरलिंग प्रशाला, वळसंग, कोनापूरे प्रशाला, आहेरवाडी, १३ व १४ जून रोजी सोनटक्के प्रशाला, तांदूळवाडी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत शिबिर होणार आहे.
यासाठी एक नायब तहसीलदार, चार मंडल अधिकारी, १८ तलाठी, एक कार्यालयीन कर्मचारी व २५ महा ई. सेवा- केंद्रचालक यांची नियुक्ती केली आहे.
शहरातही विविध महाविद्यालयांमध्ये शिबिरे
विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांसाठी सोलापूर शहरातील संगमेश्वर महाविद्यालय, बीएफ दमाणी प्रशाला, एसव्हीसीएस प्रशाला (भवानी पेठ), एस. के. बिराजदार प्रशाला (शेळगी), भारती विद्यापीठ
(जुळे सोलापूर), ११ ते १२ जून, हरिभाई देवकरण प्रशाला, नेताजी प्रशाला (निलम नगर), वालचंद कॉलेज (एकता नगर), इंडियन मॉडेल स्कूल (जुळे सोलापूर),
बीएमआयटी कॉलेज (हिरज रोड प्रशाला), १३ व १४ जून, कोंडी व मार्डी ग्रामपंचायत कार्यालय, ज.रा. चंडक प्रशाला (बाळे) आणि वडाळा कॉलेज येथे देखील ११ ते १४ जूनपर्यंत शिबिरे होणार आहेत.
0 Comments