महावितरणचे आश्वासन; अन्नत्याग आंदोलन मागे अन्नत्याग उपोषण
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
घणसोलीत सातत्याने सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी नागरिकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
नवी मुंबई: दिवसेंदिवस विजेच्या
वाढत्या लपंडावामुळे घणसोली गावातील हजारो नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे संतापाची लाट उसळलेली आहे. सलग दोन महिन्यांपासून बत्ती गुलचे प्रकार वाढत आहेत.
याविरोधात अखिल भारतीय युवा सेनेने मंगळवारी एक दिवसीय उपोषण सुरू केले होते. मात्र, काही तासांतच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
घणसोली गावातील मुख्य रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास डीपी बॉक्सला आग लागली. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे ती विझविली.
माजी सरपंच दगडू चाहू पाटील चौकानजीकच्या दुर्गा हॉटेल, प्रवीण केबल नेटवर्क पासून ते आदिशक्ती
नगर परिसरात वीरेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका कमल पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत तसेच कोंबडी चाळ परिसरात सलग २० तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
'ही' कामे तत्काळ करणार
• आंदोलनस्थळी महावितरणचे वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, धनंजय मोहोड, ऐरोली उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. एन. गोफणे यांनी भेट देऊन नवीन कामे सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.
• नादुरुस्त केबल, फिडरपिलर बॉक्स बदलणे तसेच भूमिगत केबल पावसाळ्याच्या आत कामे केली जातील,
असे लेखी आश्वासन महावितरण वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
उपोषणात पाठिंबा
अ. भा. युवा सेनेचे घणसोली विभागाचे अध्यक्ष मयूर मढवी आणि ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष आदित्य क्षीरसागर यांनी माजी सरपंच दगडू चाहू पाटील चौकात उपोषण सुरुवात केले होते.
त्यात माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे, प्रकल्पग्रस्त नेते दीपक ह. पाटील, उल्हासबुवा पाटील, सूर्यकांत पाटील, संजय प्र. पाटील, प्रेमनाथ घ. मढवी आदीनी पाठिंबा दर्शवून सहभाग घेतला होता.
0 Comments