सीईओंचा मोठा निर्णय! झेडपीच्या शाळांमध्ये भरणार आता सेमी इंग्रजीचे वर्ग; जिल्हा परिषद देणार पुस्तके अन् शिक्षकांना प्रशिक्षणही
सोलापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे १५० ते १७५ शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येतील.
त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, असा धाडसी निर्णय पहिल्यांदाच जिल्हा परिषदेने घेतला असून यामुळे निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढेल असा विश्वास मुख्याध्यापकांना आहे.
बुधवारी (ता. २९) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक पार पडली.
तत्पूर्वी, जिल्ह्यातील १५० ते १७५ जिल्हा परिषद शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी,
अशी मागणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार त्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
तसेच त्या वर्गातील तथा शाळांमधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडूनच पुस्तके पुरविली जाणार असून शाळांवरील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही यावेळी ठरले. शाळांची पटसंख्या १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते.
ती सात ते आठ टक्के वाढविण्यात यश आले आहे. उर्वरित पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले.
शाळा एकत्रिकरणाचा अहवाल द्या
जिल्ह्यातील अनेक गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा (मुला-मुलींच्या) वेगवेगळ्या ठिकाणी भरतात. त्या एकत्रित करण्यात येणार आहेत. दुसरीकडे काही शाळांची पटसंख्या खूपच कमी आहे.
अशा शाळांचा अहवाल देण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिले आहेत.
शाळांच्या मागणीनुसार सेमी इंग्रजीच्या वर्गास परवानगी
जिल्ह्यातील सुमारे १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. अशा इच्छुक शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके जिल्हा परिषदेकडून पुरविण्यात येणार आहे. तेथील शिक्षकांना त्यासंदर्भातील प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
0 Comments