खळबळजनक... माढ्याचा तिढा सगळ्याच निवडणुकांत कोणाचा न कोणाचा खोडा!
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत माढा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अगदी पहिल्या निवडणुकीपासून पडत आलेला आहे,
त्यामुळे माढा लोकसभेची निवडणूक कायमच चर्चेत राहिलेली आहे.लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत माढा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अगदी पहिल्या निवडणुकीपासून पडत आलेला आहे, त्यामुळे माढा लोकसभेची निवडणूक कायमच चर्चेत राहिलेली आहे.
यंदा ती भाजपमधील उमेदवारीची स्पर्धा आणि त्यातून मोहिते पाटील यांनी केलेले बंड यामुळे माढ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते.
शेवटी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढ्यातून लोकसभेसाठी शड्डू ठोकला.पंढरपूर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रेचनेनंतर 2008 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघ
अस्तित्वात आला. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, तर सातारा जिल्ह्यातील फलटण,
माण-खटाव या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. माढा लोकसभेची पहिली निवडणूक 2009 मध्ये झाली आणि ती देशभर चर्चिली गेली. कारण माढा लोकसभा मतदारसंघातून पहिले
खासदार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार हे निवडून आले होते. त्यानंतर ते केंद्रात कृषिमंत्री होते. पवारांनी प्रतिनिधीत्व केलेला हा माढा लोकसभा मतदारसंघ देशाच्या नकाशावर गेला.
माढ्याच्या 2009 च्या निवडणुकीसाठी सोलापूरमधून रणजितसिंह मोहिते पाटील तत्कालीन आमदार प्रतापसिंह मोहिते पाटील हे इच्छूक होते. प्रतापसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढविण्यावर ठाम होते.
त्यामुळे मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटविण्यासाठी अखेर शरद पवार यांनाच माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवली.
त्या निवडणुकीत पवारांच्या विरोधात भाजपकडून सुभाष देशमुख , तर महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवली. त्या निवडणकीत शरद पवारांनी तीन लाख 14 हजार मतांनी बाजी मारली होती.
शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढविल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुरक्षित असा बारामती लोकसभा मतदारसंघ रिकामा झाला होता.
त्यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली, त्या वेळी त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांच्या जागेवर रणजितसिंह मोहिते पाटील यांना पवारांनी राज्यसभेवर पाठविले होते.
पुढील 2014 च्या निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, त्याच माढ्यातून ‘माढा आणि शरद पवारांना पाडा’ अशी घोषणा दिली गेली. त्यानंतर पवारांनी 2014 च्या निवडणुकीत माघार घेतली.
त्यांच्या जागी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यावेळीही त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील हेही उमेदवारीसाठी आग्रही हेाते.
मात्र, विजयदादांना उमेदवारी दिल्याने प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली होती.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात महायुतीने त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती.
मोदी लाटेवर स्वार होत सदाभाऊंनी त्यावेळी चार लाख 64 हजार मते घेतली होती. मात्र, विजयदादांनी मोदी लाटेतही 25 हजार 344 मतांनी विजय मिळविला हेाता.
माढ्यात 2019 च्या निवडणुकीतही उमेदवारीसाठी रस्सीखेच झाला होता. मोहिते पाटील हे रणजितसिंह यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.
मात्र, पक्षांतर्गत विरोधकांकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता. उमेदवारीला होणारा विरोध पाहून पुण्यातील एका बैठकीतून रणजितसिंह मोहिते पाटील हे तडकाफडकी बाहेर पडले होते,
त्यानंतर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीतील मुस्कटदाबीला कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपने फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली.
त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली.मागील निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी माढ्यावरील दावा सोडला होता.
या वेळी मात्र मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र, पुन्हा मोहिते पाटील यांना डावलण्यात आले.
माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून माढ्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
एवढ्यावर क्लायमॅक्स होईल तो माढा कसला. महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख यांनीही गुरुवारी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषण केली
आणि माढा पुन्हा एकदा चर्चेत आला. पण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. देशमुख यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा मागे घेतली.
0 Comments