धक्कादायक प्रकार...पत्नी सतत फोनवर बोलत असल्याने पती संतापला, रागाच्या भरात पोटात चाकू खुपसला
डोंबिवलीमध्ये पतीने आपल्या पत्नीवर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त समोर आलं आहे. तर आरोपी पतीने घटनास्थळावरुन पळ काढला.
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात ही घटना घडली आहे.
या परिसरात राजू हिवाळे हा आपल्या परिवारासोबत राहतो. या दाम्पत्याला दोन मुले सुद्धा आहेत. राजू आणि त्याची पत्नी यांचा संसार सुरळीत सुरू होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजू आपल्या पत्नीच्या चारित्यावर संशय घेत होता. या कारणावरुन घरात वारंवार वाद सुद्धा होत होते.
सोमवारी राजूची पत्नी मोबाईलवर बोलत होती. आधीच राजू हा पत्नीवर संशय घेत होता
आणि त्यातच पत्नी मोबाईलवर बोलत असल्याचं पाहून राजूच्या मनात संशय अधिक बळावला.
त्यानंतर राजूने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, राजूने चाकूच्या सहाय्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला.
रागाच्या भरात राजू याने आपल्या पत्नीच्या पोटावर सपासप वार केले. धारदार चाकूने हल्ला केल्याने राजूची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तर आरोपी राजू याने घटनास्थळावरुन पळ काढला.
घरातील स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेने मदतीसाठी आरडा-ओरड सुरू केला.
तिचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. घरातील दृश्य पाहून शेजाऱ्यांनाही एक धक्काच बसला.
यानंतर शेजाऱ्यांनी मिळून पीडित महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. पीडित महिलेला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.
मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. दाम्पत्यांच्या मुलांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान जखमी अवस्थेत असलेल्या पीडित महिलेने सुद्धा पोलिसांना जबाब दिला असून तिच्या जबानीत संपूर्ण घडलेला प्रकार समोर आला आहे.
या जबाबानुसार पोलिसांनी राजू याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी राजू याचा शोध सुरू केला आहे. आरोपी राजू याच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम कार्यरत आहेत.
0 Comments