सांगोला शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर
करून पाणीटंचाई काळात नगरपरिषदेस सहकार्य करावे
सांगोला : सांगोला नगरपरिषद हद्दिचे क्षेत्रफळ ६८.८२ चौ. कि. मी इतके असून यामध्ये सांगोला शहर व शहराबाहेरील १३ वाड्यावस्त्याच्या समावेश आहे.
सांगोला शहराची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३४ हजार ३२१ इतकी असून सध्याची लोकसंख्या
सुमारे ३८ हजार इतकी आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून वाढीव लोकसंख्येचा विचार करता मागणीनुसार व गरजेनुसार पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.
गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने सध्या आपल्याकडे पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणीपुरवठा करण्याबाबतच्या अनेक समस्या लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. नगरपालिका हद्दीतील लोकसंख्येला पुरेसा व सुरळीत
पाणीपुरवठा करण्यासाठी इसबावी सुधारीत पाणीपुरवठा योजना सन २०१३ मध्ये कार्यान्वित झालेली आहे. उजनी धरणाखाली भिमानदी बंधारा (पंढरपूर) येथून पाणी उपसा केला जातो.
सदर ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी २७० एच. पी. च्या २ मोटारी, १२५ एच. पी. ची मोटर असून पंढरपूर सांगोला पाईपलाईन ४०० मि.मी. व्यासाची असून त्याची लांबी ३४ कि. मी. इतकी आहे.
सांगोला शहराला पिण्यासाठी इसवावी येथील भीमा नदीवरील पंढरपुर को. प. बंधा-यातुन प्रति दिन सरासरी ५० लाख लिटर्स पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो.
पंढरपूर येथून मोटारीच्या माध्यमातून उचललेले पाणी सांगोला नगरपरिषद हद्दीत एकुण ११ पाण्याच्या उंच टाक्यामध्ये साठवणूक केले जाते. साठवणूक करण्यात येणारा पाणीसाठा क्षमता ३०.२५ लक्ष लिटर्स इतका आहे.
सांगोला नगरपरिषद हद्दीत एकुण कार्यरत १९६ विंधन विहीरी आहेत.आगामी काळात पाणीपुरवठा सुरळीत
होणेसाठी शहरातील मुबलक पाणीसाठा असलेल्या विहिरींचा शोध घेवून शहरात आवश्यकतेनुसार टँकरव्दारे पाणीपुरवठा करणेचे नियोजित आहे.
पाणी म्हणजे जीवन आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचे नळ वाहते सोडू नयेत. तसेच पाणी जपून वापरले पाहिजे. यासाठी नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
यावर्षी उन्हाची दाहकता व कडक उन्हाळा लक्षात घेता तसेच पाण्याची गरज व मागणी विचारात घेता उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर
करून पाणीटंचाई काळात नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.
0 Comments