ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार हे सोलापूर जिल्ह्यात असतानाच
अभिजित पाटलांच्या विठ्ठल कारखान्यावर जप्तीची कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत धक्का बसला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
थकीत कर्जाप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने कारखान्यावर कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण 430 काेटी रुपये थकवल्याप्रकरणी राज्य सहकारी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक
व्यवस्थापक कैलास घनवट यांनी तक्रारीनुसार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता.
राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईच्या विरोधात अभिजित पाटील हे पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीमध्ये कारवाईला दिलेली स्थगिती उठवली.
त्यानंतर तातडीने आज (ता. २६ एप्रिल) बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल कारखान्यावर येऊन साखरेची सर्व गोदामे सील केली आहेत. पोलिस बंदोबस्तात साखर कारखाना जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिजित पाटील हे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सक्रिय आहेत. ते आज करमाळ्यात शरद पवार यांच्या सभेला उपस्थित होते.
त्याचवेळी राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे, त्यामुळे अभिजित पाटील हे सभा अर्धवट सोडून
पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. या कारवाईमुळे अभिजित पाटील आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या सभेत बोलताना शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्या
पंढरपूर-मंंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या.
भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडून भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. आताही शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना विठ्ठल सहकारी साखर काखान्यावर कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
0 Comments