मोठी बातमी..फडणवीसांना भेटूनही उत्तम जानकर शरद पवारांकडे का गेले?; शहाजीबापूंची मार्मिक टिपण्णी...
लगीन जुळत आलतं; पण नवरदेवाने एवढा हुंडा मागितला की, आम्ही बेशुद्ध पडायचंच राहिलो होतो,
अशी मार्मिक टिपण्णी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना पाठिंबा
देणाऱ्या उत्तम जानकर यांच्या संदर्भात केली.माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी काही
दिवसांपूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यासह
विशेष विमानाने नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी जानकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
त्या भेटीनंतर जानकर यांनी मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मदत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याबाबत विचारले असता फडणवीस-जानकर भेटीवेळी उपस्थित असलेले
शहाजी पाटील यांनी जानकर यांच्यासंदर्भात ही टिपण्णी केली आहे.माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार दौरा सांगोल्यात सुरू आहे.
त्यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी उत्तम जानकरांबाबत भाष्य केले. ते म्हणाले, लगीन जुळत आलतं; पण नवरदेवाने एवढा हुंडा मागितला की आम्ही बेशुद्ध पडायचं राहिलो होतो.
त्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच सांगितले होते की, मी तत्वाने आणि निष्ठेने राजकारण करीत असतो. मदत करून अनेकांना उभे केले आहे. असल्या फालतू गोष्टी मला आवडत नाहीत.
मी भविष्यात तुम्हाला मदत करून संकटातून बाहेर काढीन असा शब्द दिला.
तरीही जानकरांनी ऐकले नाही.मी भाजपला सहा महिन्यांपासून खेळवत होतो, असे उत्तम जानकारांनी मला सांगितले होते.
ते मला गुरू मानत होते; परंतु त्यांनी मलाही खेळवलं. उत्तम जानकर यांचं कर्म त्यांना फळ देईल. मला माळशिरसची जनता अतिशय चांगली माहिती आहे. बारावीत असताना
मी उत्तम जानकर यांना राजकारणात आणले. माळशिरसची जनता प्रचंड स्वाभिमानी आहे.
जानकरांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल, असा इशाराही शहाजी पाटील यांनी दिला.
0 Comments