सांगोला दौऱ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या कार्यालयालाही भेट
भाजपने माढ्याचे तिकीट नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील सांगोला दौऱ्यावर आले असता, मी लोकभावना जाणून घेण्यासाठी फिरत असल्याचे सांगितले. माढा लढविणार की नाही,
याविषयी कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट न केल्याने सध्या तरी धैर्यशील मोहिते पाटील 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेतच असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोला दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या कार्यालयालाही भेट दिली. शरद पवार गटाच्या कार्यालयात त्यांचे स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या
नेत्या जयमाला गायकवाड यांनी केले. त्या ठिकाणी मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. याच दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या घरीही भेट दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीमधील घटक पक्ष असला तरी साळुंखे आणि मोहिते पाटील यांचे ऋणानुबंध जुने आहेत, त्यामुळे त्यांनी साळुंखे यांच्या घरी भेट दिली.
माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर होते. सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
सांगोला शहर, वासूद, जवळा, घेरडी, वाणी चिंचाळे, वाकी, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव इत्यादी गावांचा दौरा करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील सांगोला येथे आले होते.
'आमचं ठरलंय' म्हणत गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटलांचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून 'भावी खासदार' असा उल्लेख धैर्यशील मोहिते पाटील यांचा करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील
माढा लोकसभा लढविणार असेच सूतोवाच ते करत आहेत. परंतु भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्यानंतर मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातील
विविध गावांमध्ये आपला दौरा सुरू ठेवला आहे. मोहिते पाटील दौरा करत असले तरी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, एवढेच ते सांगत आहेत.
'आमचं ठरलंय'वर नो कॉमेंट्स
मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते 'आमचं ठरलंय' ही पोस्ट सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात फिरवत आहेत. भाजपने तिकीट देण्याअगोदर त्यांच्या 'आमचं ठरलंय' यावर मोठी चर्चा झाली होती.
भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देताच तुमचं नेमकं काय ठरलंय असे विचारले असता, 'नो कॉमेंट्स' एवढेच उत्तर धैर्यशील मोहिते पाटील हे देत आहेत.
'तुतारी' वाजविण्याचे संकेत
धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीसंदर्भात कोणतीही ठोस भूमिका मांडत नसले तरी सोशल मीडियावर मात्र धैर्यशील मोहिते पाटील 'तुतारी' हाती घेणार
असल्याचे संकेत मिळत आहेत. मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार? तुतारी हाती घेऊन निवडणूक लढविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments