खळबळजनक ..मला व्हिलन बनविण्याचा प्रयत्न; डॉ. अनिकेत देशमुखांच्या पोस्टमुळे शेकापमधील खदखद चव्हाट्यावर
सांगोल्याच्या शेतकरी कामगार पक्षातील मतभेद पुन्हा एकादा चव्हाट्यावर आले आहेत. माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू तथा 2019 च्या
विधानसभा निवडणुकीतील शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
ही खदखद व्यक्त करताना डॉ. अनिकेत यांनी पक्षातील काही नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, येत्या सोमवारी (ता. 11 मार्च) होणाऱ्या शेकापच्या शेतकरी मेळाव्याला आपला पाठिंबा नाही,
असेही डॉ. अनिकेत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे शेकापमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुका शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला बनविला होता. गणपतराव देशमुख यांच्यानंतर या बालेकिल्ल्याला तडे जाताना दिसत आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख यांनी शिवसेनेचे शहाजी पाटील यांना निकराची झुंज दिली होती. त्या निवडणुकीत अनिकेत यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता.
पराभवानंतर डॉ. देशमुख हे आपल्या पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे ते मतदासंघातून काही दिवस दुरावले होते.डॉ. अनिकेत देशमुख हे शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर गणपतआबांचे दुसरे नातू
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून शेतकरी कामगार पक्षाच्या वाढीसाठी वेळ दिला. त्यांनी पक्षासाठी वेळ दिल्यामुळे संघटनेवर त्यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते.
अनिकेत देशमुख हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगोल्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. दोन्ही डॉक्टर बंधूंमध्ये आलबेल असल्याचे दिसून येत नाही. मात्र, दोघेही स्वतंत्रपणे आपली वाटचाल करत आहेत,
त्यांचे कार्यकर्तेही आपलाच नेता विधानसभा लढविणार असल्याचे ठासून सांगत आहेत, त्यामुळे शेकापमधील अंतर्गत संघर्षही पुढे येताना दिसत आहे.
डॉ. अनिकेत देशमुखांची पोस्ट
सांगोल्यातील जनतेमध्ये माझी चुकीची प्रतिमा तयार केली जात आहे. अचानकपणे 40 लोक एकत्रित येऊन बैठक घेतात.
दीड महिन्यापूर्वी एक गाडी घेण्यात आली आहे. त्या गाडीचं करायचं काय, याचंही राजकारण सुरू आहे. वैयक्तिक कार्यक्रम घेऊन तुम्ही गाडी द्या.
शेतकरी आणि शेतकरी कामगार पक्षाला पुढे करून शेतकरी मेळाव्यातून गाडी प्रदान करण्याचे नाटक केले जात आहे. महिनाभरापासून मी शेतकरी मेळावा घेऊ, असे सांगत होतो.
पण, शेकापमधील काही लोक माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करीत आहेत. मला व्हिलन बनवायचे काम सुरू आहे, असे डॉ. अनिकेत देशमुख यांनी म्हटले आहे.मी कसा खोटा आहे, हे दाखवले जातेय
ते म्हणाले, आपण कोणाच्या दावणीला बांधले जातोय? ठेकेदारांच्या दावणीला पक्ष बांधतोय का? पक्ष ठेकेदारावर चालतो का? आपला शेकाप हा शेतकरी, कामगार, दीनदलित, वंचित या लोकांवर चालतो.
राजकारण हे ज्यांच्यावर अन्याय होतो, तो दूर करण्यासाठी करावं. ठेकेदार राजकारण करत नसतात, लोकप्रतिनिधींनी समजून घ्यावे. आपण काय बोलतो? आपली तत्त्व काय आहेत?, आपण काय करतो?,
आपली उद्दिष्टे काय आहेत? कोणाविरुद्ध काय करतो, खोट्या बातम्या कशा पसरवतो, आपला अजेंडा कशा पद्धतीने राबवतो या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे.
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांना कशा पद्धतीने बातम्या पुरवल्या जातात, याची मला माहिती आहे. पण, कधीही मी विरोध केला नाही. मी कसा खोटा आहे, हे सातत्याने दाखवले जात आहे.
चिटणीसांनी साथ दिली नाही
वारंवार पाठपुरावा करूनही चिटणीसांनी शेतकरी मेळाव्यासाठी मला साथ दिली नाही.
शेतकरी मेळाव्यासाठी यांना पंधरा दिवस गावभेट दौरे करावे लागत आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काय साध्य करायचं आहे,
हे तुम्हाला माहिती आहे. दुसऱ्याला व्हिलन करून, दुसऱ्याचे ओढून पुढे जाता येत नसतं, असं अनिकेत देशमुख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शेकापमध्ये विधानसभेसाठी संघर्ष नाही : डॉ.बाबासाहेब देशमुख
गणपतराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर शेतकरी कामगार पक्ष पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
विचारधारेवरच शेकाप मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभेसाठी शेकापमध्ये संघर्ष चालला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे.
शेकापचा उमेदवार कोणी असो. सांगोल्यात शेकापचा आमदार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शेतकरीहितासाठीच मेळावा घेतला आहे, असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
0 Comments