सांगोल्याचे पुढचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख असतील; रोहित पवारांचे भाकित
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे
आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. झाडी, डोंगारवाल्या आमदारांना सांगोल्यातील चांगलं कधी दिसलंच नाही. दुसऱ्या राज्यातील हॉटेल त्यांना चांगलं वाटत आहेत.
पण, ते पुढचे आमदार होणार नाहीत, तर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेच सांगोल्याचे पुढील आमदार असतील, अशी भाकित आमदार पवार यांनी केले.
सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील होते. रोहित पवार म्हणाले, काय हितलं (सांगोला) वातावरण, काय ते लोक,
काय येथील लोकांचे प्रेम, काय तो स्वाभिमान, हे सगळं जबरदस्तच! परंतु येथील झाडीवाले आमदारांना (शहाजी पाटील) ते कधी दिसलंच नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.
काही महाशक्ती घराघरांत वाद निर्माण करून तो कुटुंब, पक्ष, पार्टी फोडत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसून दुसऱ्याचे कुटुंब फोडण्यासाठी त्यांना अधिक वेळ आहे. पण, मराठी माणूस कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही.
माझ्यावर कितीही कारवाया करा, मला अटक केली, तरी मी माझा स्वाभिमान व निष्ठा सोडणार नाही, असा निर्धारही रोहित पवार यांनी बोलून दाखवला.
आमदार पवार म्हणाले, भाजपला सामान्य लोकांचे काहीच देणेघेणे नाही, त्यांना फक्त सत्तेशी देणेघेणे आहे. आज घर फोडून, पक्ष पार्ट्या फोडून सामान्यांसाठी नाही तर स्वतःच्या विकासासाठी पक्षबदल करीत आहेत.
राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. मी भाजपवर टीका करीत असल्यामुळेच माझ्यावर अनेक कारवाया होत
असून अशा कारवायांना मी कधीच भिक घालत नाही. आज सामान्य शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. आजच्या परिस्थितीकडे लोकांनीच वेळीच सावध झाले पाहिजे
या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरविंद पाटील, राष्ट्रवादीचे बाबूराव गायकवाड, सूरज बनसोडे व इतर अनेक महाविकास आघाडीचे नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
0 Comments