ब्रेकिंग! 36 लाख मतदार निवडणार सोलापूरचा नवा खासदार
सोलापूर, :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असून 42 सोलापूर (अनु. जाती) व 43 माढा या
लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून जिल्ह्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी
व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय
पक्षांच्या प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल
अधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह इंडियन नॅशनल कॉग्रेसचे मनिष गडदे, नंदकुमार पवार,
भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी, शिवसेना ठाकरे गटाचे जरगीस मुल्ला, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे नरसिंग म्हेत्रे, मोहन कोकूल, राष्ट्रवादी पार्टीचे (अजित पवार) संतोष जाधव,शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे,
आम आदमी पार्टीचे खतीब वकील, बसपाचे शिलवंत काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की प्रत्येक नागरिक, राजकीय पक्ष यांनी आदर्श आचारसंहितांचे उल्लंघन होणार नाही
याबाबत दक्षता घ्यावी. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने संबंधिता विरोधात तात्काळ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, याची नोंद घ्यावी असेही त्यांनी सुचित केले.
तसेच भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जाहीर होईल, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
19 एप्रिल 2024 असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024, मतदानाची तारीख 07 मे 2024 तर मतांची मोजणी-04 जून.2024 आणि निवडणूक प्रक्रिया दिनांक 06 जून 2024 रोजी पूर्ण होईल,
अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदार संघ आहेत, 42 सोलापूर (अ.जा.) व 43 माढा असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 18 लाख 76 हजार 498, स्त्री मतदार 17 लाख 50 हजार 297 व इतर मतदार 280 असे एकूण 36 लाख 27 हजार 075 एवढे मतदार व 4 हजार 591 सैनिक मतदार आहेत.
जिल्ह्याचा मतदाराची सरासरी दि 15.3.2024 रोजी 76.74% एवढा आहे. मतदारांची लिंग गुणोत्तर हा 933 आहे. जिल्ह्यामध्ये 18-19 वयोगटातील एकूण मतदार
52 हजार 783 असून 20-29 वयोगटातील मतदार हे 7 लाख 12 हजार 147 इतके आहेत. 85 वर्षावरील मतदारांची संख्या हि 54 हजार 991 असून दिव्यांग मतदार संख्या हि 27 हजार 194 इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मुळ मतदान केंद्र 3599
(शहरी 1243 व ग्रामीण 2356) व 18 सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण 3 हजार 617 मतदान केंद्रे आहेत. तसेच 3 हजार 599 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 27 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.
0 Comments