...तर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन; शहाजीबापू पाटलांचे ठाण्यात वक्तव्य
भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख यांच्यातील वाद हा वैयक्तिक मालमत्तेवरुन झाला आहे. यातून शिवसेना भाजप असे पक्षीय युद्ध लागणार नाही.पक्षीय धोरणाचेही भांडण होणार नाही.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपये घेतल्याचा आमदार गायकवाड यांनी केलेला आरोप निराधार असल्याची स्पष्टोक्ती सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी रविवारी ठाण्यात केली.
ठाण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्युपीटर रुग्णालयात लहान मुलांच्या ह्दयाला असलेल्या छिद्रावरील शस्त्रक्रिया शिबिराला त्यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
ते पुढे म्हणाले, विकासनगरी आहे, त्या भागात असे प्रश्न उद्भवले आहेत. वैयक्तिक कारणातून कोणीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप करु नये.
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्यावर खापरही फोडू नये, असा टोलाही त्यांनी भाजपच्या गणपत गायकवाड यांना लगावला आहे. या प्रकरणाला पक्षीय रंग नको, असेही ते म्हणाले.
खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सुरुवातीपासूनच विविध प्रकारचे आरोप करीत असून ते मुख्यमंत्री झाल्याचेच त्यांना रुचलेले नसल्याचेही एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी स्पष्ट केले.
महेश यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तर पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. हा गोळीबाराचा प्रकार खेदजनक असून महेश हे बोलण्याच्या स्थितींत नाहीत.
ते बोलण्याचा प्रयत्न करीत होते. परंतू, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना बोलता आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन...
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने देव दूत आपल्यासोबत आहेत. कोणी काय आरोप करतो,
याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून रुग्णांना खूप मदत झाली. आपल्या सांगोला मतदारसंघातील रुग्णांना दोन कोटींची मदत म्हणून त्यांनी दिले.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एका तरी रुगाणाला एक लाख रुपये मदत केली आहे का? केली असेल तर मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन.
हे एक दौरा करतात आणि मग तीन महिने मातोश्रीवर दारे बंद करुन बसतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
गाजावाजा न करता १५० शस्त्रक्रिया-लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रावरील शस्त्रक्रिया डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात शिबिर झाले.
यात ६०० मुलांच्या शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प आहे. त्यातील १५० शस्त्रक्रिया रविवारी ठाण्यात झाल्याची माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
रुग्णांसाठी काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याप्रमाणे श्रीकांत शिंदे यांनी हे काम केल्याचेही ते म्हणाले. ज्युपीटर रुग्णालयात आयाेजित शिबराला भेट दिल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त कले.
0 Comments