सांगोला तालुक्यात कुसळ उगवणाऱ्या जागी डाळिंबाच्या बागा;
छपराच्या झाल्या माड्या अन् त्यापुढं उभ्या अलिशान गाड्या
न्यासारख्या डाळिंबाचा कॅलिफोर्निया सांगोला म्हटलं की, डोळ्यासमोर जोडूनच दुष्काळ हा शब्द उभा राहतो, सांगोला आणि दुष्काळ या दोन शब्दांमध्ये फारच ऋणानुबंध असल्याचे
कायमच जाणवते, परंतु येथील शेतकऱ्याने दुष्काळी मानसिकता सोडून मोठ्या जिद्दीने कुसळ उगवणाऱ्या ठिकाणी डाळिंबाची लागवड करून सांगोल्याची ओळखच बदलली आहे.
पंढरपूर पाण्याचं, मंगूड दाण्याचं, सांगुलं सोन्याचं अशी एक म्हण माण परिसरात प्रसिद्ध आहे. कालांतराने या म्हणीमध्ये बदल झाला, पंढरपूर पाण्याचं, मंगुड दाण्याचंच राहिलं
व सांगूल सोन्यासारख्या डाळिंबाचं झालं. डाळिंबातील आर्थिक सुबत्तेमुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी कायमच दोन पाऊल पुढे राहिले आहेत.
सांगोला कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त तालुका म्हणूनच या तालुक्याची ओळख आहे. येथील शेतकऱ्यांच्या माथी कायमच दुष्काळ पाचवीलाच पुजला आहे.
येथील शेतकऱ्यांना पाण्याअभावी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी जावे लागत होते.
संकटाशी सामना करीत शेतकऱ्यांनीही दुष्काळातही मोठ्या कष्टाने येथील कमी पाण्यावर डाळिंबाची लागवड करून बागांची जोपसना केली आहे.
प्रत्येक अण थोड्या फार प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घेऊ लागला, डाळिंबाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू लागले
तालुक्यात आज २५ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्तच डाळिंबाची लागवड आहे. विशेष म्हणजे जवळजळ सर्वच (९९ टक्के)
क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. डाळिंबाच्या पिकामुळे तालुक्यातील अर्थकारणावर फार मोठा फरक झाला असून शेतकऱ्यांच्या जीवनमानातही आमूलाग्र बदल झाला आहे.
कायमस्वरूपी पाणी येथील शेतीला मिळत नाही, कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून डाळिंब पिकाकडे पाहिले जाऊ लागले,
ज्या क्षेत्रावर दोन किंवा तीन पोती ज्वारी होत नव्हती त्या क्षेत्रावर शेतकरी आज लाखोंमध्ये व्यवहार या पिकांच्या माध्यमातून करू लागला आहे.
माळरानावर कुसळदेखील उगवणे कठीण होते अशा जमिनीवर शेतकऱ्यांनी कष्टाने आज कमी पाण्यावर डाळिंबाच्या बागांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करून
स्वताच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल करून घेतला आहे. डाळिंबाच्या लाखोंच्या उलाढालीमुळे शेतकऱ्यांनी छपराच्या घरापुढे चारचाकी गाड्या उभ्या राहू लागल्या.
अधिक वाचा:कहाणी उसाच्या गुऱ्हाळांची; साखरेच्या पट्ट्याला सेंद्रिय गुळाची गोडी
यातूनच ग्रामीण भागातही मोठ्या इमारती उभारू लागल्या, तालुक्यातील अजनाळेसारख्या गावाने तर सर्वच क्षेत्रात आर्थिक सुबत्ता निर्माण केली आहे ती फक्त डाळिंबाच्या उत्पादनातून.
तालुक्यात गणेश, भगवा, रुबीसारख्या विविध जातींच्या डाळिंबाची लागवड केली आहे. त्यापैकी भगवा जातीच्या डाळिंबाची लागवडीचे क्षेत्र फार मोठे आहे.
डाळिंबासाठी येथील हवामानदेखील चांगले असल्याने डाळिंबाचा आकार व रंग चांगला होती. त्यामुळे परदेशातही येथील डाळिंबाला मागणी होत
असल्याने परकीय चलनही मिळू लागले आहे. डाळिंबामुळे इतर उद्योगांचीही तालुक्यात वाढ होऊ लागली आहे. डाळिंबाला पॅकिंग करण्यासाठी लागणारे बॉक्स, कतरण तयार करणारे
उद्योग येथे उभारल्यामुळे येथील तरुणांच्या हाताला काम मिळू लागले आहे. डाळिंबामुळे तालुक्याच्या बाजारपेठेतील अर्थकारण बदलून उद्योग वाढीस लागले आहेत.
विक्रीतही दोन पाऊल पुढे
तालुक्यातील डाळिंब उत्पादन मोठ्या प्रमाणात व कायमस्वरूपी असल्याने येथे डाळिंब खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. शेजारच्या विविध राज्यांमधून हे व्यापारी डाळिंब खरेदीसाठी वास्तव्यास आहेत
तर काही व्यापाऱ्यांनी आपली कुटुंबेही सांगोल्यात आणली आहेत. कायमस्वरूपी माल मिळत असल्याने व्यापारी येथून बाहेर जातच नाहीत,
याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. डाळिंब बागेत येऊन जागेवरच हे व्यापारी माल खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाऊन माल विकण्याचा त्रास कमी झाला आहे.
शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादनातून अजून चार पाऊल पुढे जाण्यासाठी..
• डाळिंबावर विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग उभारणीची गरज.
• मर व तेल्या रोगावर कायमस्वरूपी उपायोजना झाली पाहिजे.
• डाळिंबाला हमी भाव मिळावा, त्याद्वारे प्रतवारी (जातवारी) प्रमाणे दर देण्यात यावा.
• कमी भावाच्या काळात साठवणुकीसाठी माफक दरात कोल्ड स्टोरेज मिळवीत.
• शासनाकडूनच फवारणीची जैविक औषधे उपलब्ध करून द्यावीत.
अरुण लिगाडे
प्रतिनिधी लोकमत, सांगोला, सोलापूर


0 Comments