मोठी बातमी ... तुळजाभवानी मंदिराचा लेखाधिकारी सहा लाखांची लाच घेताना गजाआड
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानचे मुख्य लेखाधिकारी सिध्देश्वर मधुकर शिंदे यास सहा लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
एका शासकीय ठेकेदाराकडून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी शिंदे याने १० लाख रूपयांची मागणी केली होती.
पंचासमक्ष सहा लाख रूपये रोख स्वीकारताना तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयातून त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून अटक केले आहे.
तुळजाभवानी मंदिराच्यावतीने तुळजापूर शहरात तुळजाभवानी सैनिकी विद्यालय चालविले जाते. या विद्यालयाच्या संरक्षण भिंतीसह प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा ठेका सोलापूर येथील
एका शासकीय कंत्राटदाराला मिळाला होता. तीन कोटी ८८ लाख रूपयांचे हे एकूण काम होते. ९० टक्के बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोन कोटी रूपयांपेक्षा अधिकच्या देयकाची रक्कम तपासणी करून
मंजुरीस पाठविण्यासाठी, जमा करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा रक्कम ३४ लाख ६० हजार रूपये परत मिळवून देण्यासाठी १० लाख रूपये लाचेची मागणी केली होती.
दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी तडजोड सुरू होती. तडजोडीअंती हा व्यवहार सहा लाख रूपयांमध्ये मान्य करण्यात आला.
तडजोडीत ठरल्याप्रमाणे बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी दुपारी तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कायार्र्लयात सहा लाख रूपये स्वीकारताना लेखाधिकारी शिंदे यास अटक करण्यात आली आहे.
तुळजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सिध्दराम म्हेत्रे, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशिष पाटील यांनी केली.
0 Comments