मोठी बातमी... ग्रामपंचायतीतील सरपंचपतीची लुडबुड थांबणार!
जिल्हा परिषद सीईओंच्या पुढाकारातून गावच्या कारभारणीला मिळणार राज्यकारभाराचे धडे
जिल्ह्यातील एक हजार २४ ग्रामपंचायतींपैकी ५१२ गावांच्या कारभाराची धुरा ‘ती’च्या हाती आहे. पण, अनेक सरपंच महिलांचे पती कारभारात लुडबूड करतात.
महिला पहिल्यांदाच सरपंच झाल्याने त्यांना कारभाराची फार माहिती नसल्याने असे प्रकार होतात, ही वस्तुस्थिती आहे.
सोलापूर : जिल्ह्यातील एक हजार २४ ग्रामपंचायतींपैकी ५१२ गावांच्या कारभाराची धुरा ‘ती’च्या हाती आहे.
पण, अनेक सरपंच महिलांचे पती कारभारात लुडबूड करतात. महिला पहिल्यांदाच सरपंच झाल्याने त्यांना कारभाराची फार माहिती नसल्याने असे प्रकार होतात, ही वस्तुस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्वच महिला सरपंचांना राज्यकारभाराचे धडे देण्याचा निर्णय घेतला असून २८ फेब्रुवारीपूर्वी त्या सर्वांची कार्यशाळा होणार आहे.
गावचा कारभार हाकताना सरपंचाचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय असतात याबद्दल आता महिला सरपंचांना ‘यशदा’च्या मास्टर ट्रेनरद्वारे जिल्हा परिषदेतर्फे पहिल्यांदाच प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गावचा विकास करताना सर्वाधिक निधी कसा मिळू शकतो, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडून गावासाठी कोणकोणत्या योजना मिळतात, याबद्दलची संपूर्ण माहिती त्या महिला सरपंचांना दिली जाईल.
‘स्वच्छ भारत मिशन’मधून गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे.
सध्या गावातील प्रत्येक कुटुंबाच्या पिण्याचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून जलजीवन मिशनमधून घराघरांत नळ कनेक्शन दिले जाणार आहेत.
ही योजना गावाचा पाणीप्रश्न विशेषत: महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण असल्याने महिला सरपंचांनी त्यात विशेष लक्ष घालावे हाही या प्रशिक्षण तथा कार्यशाळेचा हेतू आहे.
‘यशदा’च्या प्रशिक्षकांसह स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या देखील सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.या’ मुद्द्यांवर होणार प्रशिक्षिण आरोग्यदायी व बालस्नेही गाव लिंग समभाव पोषक गाव (स्री-पुरुष समानता)
महिलांचे अधिकार व कायदे गावच्या कारभारातील प्रशासकीय अडचणी १५वा वित्त आयोगाचा निधी, निविदा, विकासकामे करण्याची प्रक्रिया घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, ‘जलजीवन’च्या कामाकडे विशेष लक्ष देणे
प्रशिक्षणाची गरज का पडली?
जिल्ह्यातील एकूण एक हजार २४ ग्रामपंचातींपैकी तब्बल २६२ ग्रामपंचायतींनी निधी असूनही तो २० ते ५० टक्केच खर्च केला आहे. त्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्याच हाती आहे.
त्यामुळे त्या महिला सरपंचांना प्रशिक्षण दिल्यास व त्यांची कार्यशाळा घेतल्यास त्या सर्वच गावांच्या विकासाला हातभार लागेल आणि विकासकामे जलदगतीने होईल हा हेतू आहे.
पुढील आठवड्यात प्रशिक्षण व कार्यशाळेचे नियोजन
महिला सरपंचांना प्रशासकीय पातळीवरील विविध बाबींचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिल्यास त्याचा लाभ गावच्या विकासासाठी होईल. या हेतूने पुढील आठवड्यात सोलापूर शहरात कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे.
- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर


0 Comments