मोठी बातमी...शहाजीबापू अन् आवताडेंना सावंतांचा सूचक इशारा; बाबासाहेब देशमुख, भालकेंचे केले कौतुक!
सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन आमदारांना आरोग्य मंत्री तानाजी सावतांनी आज पंढरपुरातून सूचक इशारा दिला आहे. सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब देशमुख आणि पंढरपूरचे नेते भगीरथ भालके या दोघांचा उल्लेख सावंत यांनी भावी आमदार म्हणून केला.
तसेच, माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख आणि भारत भालके यांचे राजकीय बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा देत सावंत यांनी भाजप-शिवसेनेच्या आमदारांना इशारा दिल्याचे मानले जात आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या या विधानामुळे पंढरपूर आणि सांगोल्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या विधानामुळे शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे आरोग्य मंत्री सावंत यांनी उघड भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे सोलापूर शिवसेनेतील गटबाजीही उघड झाली आहे.
दरम्यान, आमदार (स्व.) भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भारत कृषी महोत्सव कार्यक्रमात आयोजित केला होतो.
त्या कार्यक्रमात बोलताना मंत्री सावंत यांनी राज्याच्या अनेक भागात आपले नेटवर्क भक्कम असल्याचा दावाही केला आहे.
माझे राजकारण हे पाच ते सहा वर्षाचे राजकारण आहे. राजकारणातील मला फार काही कळत नाही. पण, मी जे खरं आहे, तेच बोलतो.
भगीरथ तुम्ही फार उशीर केला. स्व. आमदार भारत भालके हे माझे जुने मित्र होते. त्यांच्यासोबत 2019 मध्ये दोन वेळा बैठका झाल्या होत्या, असा गौप्यस्फोटही आरोग्य मंत्री सावंत यांनी केला.
पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी तुम्ही एक फोन केला असता, तर पंढरपुरातील आजचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते, असे सांगून भगीरथ भालके आणि बाबासाहेब देशमुख यांचे सावंत यांनी कौतुक केले.
दरम्यान, सावंत यांनी भालके आणि देशमुख यांचे कौतुक करून भाजप आमदार समाधान आवताडे आणि सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधकांना मंत्री सावंत बळ देत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोकणातील एका शिवसेनेच्या आमदाराविरोधात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अलीकडेच जाहीर वक्तव्य केले होते.
त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना आमदारांच्या विरोधात मंत्री सावंत यांनी भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
0 Comments