मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको;
मनोज जरांगेंनी सांगितलं आंदोलन कसं करायचं? दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
जरांगे यांनी राज्य सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे.
अन्यथा २४ फेब्रुवारीपासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाचवेळी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल.
मनोज जरांगे यांनी आतापर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता.
मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती.
त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
गावांमधील रास्ता रोको आंदोलनासाठी मनोज जरांगेंचा महत्त्वाच्या सूचना
प्रत्येकाने आपल्या गावात रस्ता रोको आंदोलन करायचे आहे. * कोणीही जाळपोळ करायची नाही, परीक्षा चालू असल्याने आंदोलन शांततेत करा.
सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत आंदोलन करायचे आहे. ज्याला या वेळेत आंदोलन करायला जमले नाही , त्याने संध्याकाळी 4 ते 7 वाजता आंदोलन करावे.
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आली तर त्यांना दुचाकीवरुन परीक्षा केंद्रावर सोडा. निष्पाप लोकांवर पोलिसांनी केसेस केल्या
तर पूर्ण गाव पोलीस स्टेशनला जाऊन बसा. शासकीय पदावर असलेल्या आमदार, खासदार,मंत्री यांना आपल्या दारात येऊन देऊ नका.
निवडणुकीची आचारसंहिता मोडू नका. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक घेऊ नये. निवडणूक घेतली आणि प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या गाड्या गावात आल्या तर ताब्यात घ्या.
मराठा समाजातील वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावे: मनोज जरांगे
राज्य सरकारने मराठा समाजाला २९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिले नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावे.
यापैकी एकही व्यक्ती मेली तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची असेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.


0 Comments