खळबळजनक....महिलेने लिफ्ट मागितली ; पुढे भयंकर घडले सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर : गावापर्यंत लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला नेल्यावर त्यास ‘पूर्णनग्न’ करून २५ हजार रुपयांना लुटलंय. एखाद्या कथेला साजेशी घटना
मोहोळ तालुक्यातील ढोक बाभूळगावात गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अनोळखी ३ महिलांसह ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील सोनाप्पा आप्पा गौंडदाब (वय-३४) हा व्यवसायाने पिग्मी एजंट असून तो सय्यद वरवडे, कुरुल, कामती, वाघोली, इंचगाव, सोहाळे
या पंचक्रोशीत पिग्मी वसुली करून इंचगांव येथील पतसंस्थेत भरणा करीत असतो. तो त्याच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी सोहाळे गावात मोबाईल अॅसेसरीज विक्री करीत असतो.
सोनाप्पा गौंडदाब गुरूवारी दुपारी, मोहोळहून मोबाईल अॅसेसरीज खरेदी करून गावाकडे जात असताना, दुपारच्या रणरणत्या उन्हात एका अनोळखी महिलेने ढोक
बाभूळगावापर्यंत लिफ्ट मागितली. त्याने माणुसकीच्या भावनेतून तिला गाडीवर बसवून तिच्या घरापर्यंत सोडलं. या घटनेतील लूट-नाट्यास येथूनच प्रारंभ झाला.
ती गाडीवरून उतरुन घरात जाताच त्या घरातून बाहेर आलेल्या २ अनोळखी तरुणांनी त्याच्या कॉलरला पकडून घरात नेले. त्यांनी त्याचे दोन्ही हात मागून धरून पैसे काढ,
तुझा फोन पे नंबर दे म्हणून मारहाण सुरू केली. गाडीवर घेतलेली महिला ‘ ये सोनी, जयडी, आशी धर याला ‘ असे म्हणत त्यास ‘ पूर्णनग्न ‘ करुन त्याचे फोटो काढले
आणि बोलले की पैसे दे नाही, तर इंटरनेटवर टाकतो, असे म्हणत त्याच्या जवळील २५ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. या दरम्यान २ तरुण व ४ महिलांनी पाया-हातावर लाथाबुक्यांनी मारहाण केली.
त्यावर २५ हजार रूपयांची रक्कम काढून घेतल्यावर ‘चल तुझ्यावर रेपची केस टाकतो, तुला खोट्या केसमध्ये अडकवतो’,
असे बोलून त्याच्या मोटार सायकलवर त्यातील एक पुरुष व एक महिलेने त्याला दोघांचे मध्ये घेऊन एच.पी पेट्रोल पंपाजवळ आणून सोडले.
त्या मारहाणीमुळे त्याला काही कळत नव्हते, तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांमधील एकाने त्यास पिग्मीवाला आहे असे म्हणून हा प्रकार पिग्मी मॅनेजरला फोन करून कळविला.
त्यास मदत मिळाल्यावर प्रारंभी मोहोळ रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सोलापूर सिव्हिलला रेफर करण्यात आले. त्याच्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमाविरुध्द व चार महिला सोनी, जयडी,
आशी आणि गाडीवर बसलेली महिला अशा ०६ जणांविरुध्द भादंविसं ३९५, ३४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि झालटे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


0 Comments