ब्रेकिंग न्यूज..'जरांगेंना या जागेवर तिकीट द्या', वंचितच्या मविआ बैठकीत 4 प्रमुख मागण्या
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.
यात जालनामधून मनोज जरांगे पाटील यांना तर पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं,
अशी पहिली मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 उमेदवार ओबीसी असावेत, असी दुसरी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे.
तर महाविकासआघाडीतील प्रत्येक घटकपक्षाने तसंच निवडून आलेल्या उमेदवाराने निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही,
असं लेखी वचन द्यावं, अशी तिसरी मागणी वंचितकडून या बैठकीत केली गेली.
महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत अशी चौथी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
वंचित बहुजन आघाडीची कोणासोबतही आघाडी नसताना 27 जागांवर निवडणुकीची तयारी केली होती,
असंही वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले. ज्या दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बैठकीला येतील
त्या दिवशी प्रकाश आंबेडकरही बैठकीला उपस्थित राहतील, असंही पुंडकर यांनी सांगितलं.
वंचितने प्रस्ताव दिलेले मतदारसंघ
अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा, वर्धा


0 Comments