आमदारांचे गणित ऐकून अनेकांच्या घराची राखरांगोळी,
जनताच तुमचा हिशोब करेल--डॉ भाई बाबासाहेब देशमुख
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हिशोब, गणित घालायला विद्यमान सांगोल्याचे आमदार माहीर आहेत. गेल्या तीस वर्षांपासून अशा हिशोबावरच त्यांची गुजराण आहे.
अशा हिशोबातूनच १९९९ ला हेच आमदार जेलवारीही करून आले आहेत. असे हिशोब घालूनच तुम्ही तालुक्यातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची राखरांगोळी केली आहे.
त्यामुळे हिशोब, गणित घालायच्या भानगडीत पडू नका, आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच तुमचा हिशोब करेल,
या कडक शब्दांत शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना इशारा दिला.
टेंभूच्या पाण्याचे गणित आजोबाला जमले नाही ते नातवांना कुठे जमायचं, आमच्या नादाला लागू नका या शब्दांत
आ. शहाजी पाटील यांनी माजी मंत्री स्व.गणपतराव देशमुख यांच्यावर टीका करत नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आव्हान दिले होते.
या आव्हानाचा डॉ. देशमुख यांनी खरपूस समाचार तर घेतलाच पण आ.पाटील यांचा उभा-आडवा इतिहासही चव्हाट्यावर मांडत त्यांच्या कारनाम्यांचे वाभाढे काढले.
डॉ.देशमुख म्हणाले, कोण किती पाण्यात आहे हे तालुक्यासह उभ्या राज्याला माहीत आहे.
स्व.आबासाहेबांवर टीका करण्याची विद्यमान आमदारांची पात्रता नाही. स्वच्छ, निर्मळ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी म्हणून आबासाहेबांची देशभर ओळख होती. त्यामुळे आमचं गणित घालायच्या भानगडीत पडू नका.
पाण्यासारखे स्वच्छ, निर्मळ जगात काहीच नाही. त्यामळे पाण्यावर तुम्ही बोलणे म्हणजे पाण्याचा अपमान करण्यासारखे आहे.
माण नदीचा तळ तुमच्याच बगलबवच्च्यांनी गाठला आहे. तुमच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्याचे इमले हा तळ शोधूनच वाढले आहेत. त्यामुळे आपल्याच जीवनवाहिनीला उघडीबोडकी करून तिला
पुन्हा वस्त्र नेसवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीने चार वर्षात तालुका रसातळाला नेल्याचा घणाघाती आरोपही डॉ. देशमुख यांनी केला. आमच्यावर आबासाहेबांचे संस्कार आहेत, ते आम्ही प्राणापणाने जपू.
त्यांचा नातू असल्याचा अभिमान तर आहेच, पण त्यांच्या विचारांचा जागरही तूसभर कमी होऊ देणार नाही. तुमचे संस्कार काढले तर पळताभुई थोडी होईल असा इशारा डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिला


0 Comments