धक्कादायक प्रकार...आधी मित्राला दारू पाजली, नंतर त्यालाच दगडाने ठेचून संपवलं; कारण ऐकून पोलीसही चक्रावले!
कांदिवली पूर्व येथे आढळलेल्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या मित्राला अटक केली. आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते.मात्र, या प्रेमसंबंधात मृत व्यक्ती अडसर ठरत होता.
यामुळे आरोपीने मित्राला दारु पाजून दगडाने ठेचून त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. योगेश कांबळे (वय, ३४) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कांदिवली पूर्व येथे दामू नगर परिसरात एका निर्जनस्थळी योगेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. परंतु, पोलिसांना घटनास्थळी त्याच्या डोक्याला लागलेली कोणतीही वस्तू सापडली नाही.
यामुळे योगेशची हत्या करून पुरावे नष्ट करण्यात आल्याचे पोलिसांना संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली असता घटनेच्या दिवशी योगेश आणि त्याचा मित्र रविंद्र गिरी
(वय, ३४) सोबत दारू प्यायल्याची त्यांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गिरीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.
मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानेच योगेशची हत्या केल्याची कबूली दिली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी रवींद्र गिरीला तात्काळ अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु, योगेश हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. यामुळे आरोपीने योगेशला मारण्याचा कट रचला.
सुरुवातीला आरोपीने योगशला खूप दारू पाजली. त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घातला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून हत्येत वापरलेला दगड बॅगेत भरुन घेऊन गेल्याचे आरोपीने म्हटले आहे.
0 Comments