ब्रेकिंग न्यूज ... तेव्हाच कृषिमंत्री पंजाबरावांचं आवाहन ऐकलं असतं तर.. १९६३ मध्ये झाला होता सोलापूर दौरा
सोलापूर : साठ वर्षांपूर्वी निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) दौऱ्यावर आलेले देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून जातीची नोंद करण्याचे आवाहन केले होते.
या दौऱ्याच्या तयारीसाठी आदल्या दिवशी या गावात आलेले सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनीही मराठा समाजाची बैठक घेऊन कुणबी म्हणून जातीची नोंद करण्यास सांगितले होते.
विशेष म्हणजे मंडल आयोग स्थापन होण्याच्याही १६ वर्षे आधी या दोन्ही नेत्यांनी केलेल्या या आवाहनावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
मात्र, जमीनदारांच्या प्रभावातील मराठा समाजाने दुर्लक्ष केल्याचा फटका त्या समाजातील आजच्या पिढीला बसत आहे.दरम्यान, दौऱ्याच्या तयारीसाठी शंकरराव मोहिते-पाटील हे आदल्या दिवशी निंबर्गीत आले होते.
सायंकाळी गावातील मारुती जाधव, शंकर जाधव, राम जाधव यांच्यासह मराठा समाजबांधवांची बैठक घेऊन आवर्जून जातीची कुणबी म्हणून नोंद करण्यास सांगितले होते.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत कृषक समाजाची स्थापना केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५० च्या पूर्वीपासून मराठा-कुणबी आरक्षणाची भूमिका मांडली होती. सातत्याने त्यांनी कुणबी नोंदीचा आग्रह धरला.
त्याला प्रतिसाद दिलेल्या विदर्भ, कोकणातील मराठा समाजबांधव आज ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत.मात्र, त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजबांधवांना आज संघर्ष करावा लागत आहे.
शंकरराव मोहिते-पाटील यांनी माझे आजोबा मारुती जाधव यांची पंजाबराव देशमुख यांच्याशी भेट घडवून आणली होती. तेव्हा देशमुख यांनी गावातील मराठा समाजाला कुणबी म्हणून जातीची नोंद करायला सांगितले होते.
दोन्ही नेते दूरदृष्टीचे होते. परंतु तत्कालीन समाजबांधवांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे आज समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
- सिद्धाराम वाघ, निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर.
मराठा समाजात जमीनदार आणि शेतकरी हे दोन भिन्न वर्ग आहेत. जमीनदाराबरोबर शेतकरीही स्वतःस मराठा म्हणवून घेत होते.
तेव्हा पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी वर्गाला इतर मागास प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी कुणबी नोंदी करण्याचे आवाहन केले. विदर्भ, मराठवाडा व कोकणातील मराठा शेतकऱ्यांनी कुणबी नोंदी करीत त्याला प्रतिसाद दिला.
मात्र, उर्वरित महाराष्ट्रातील जमीनदारांच्या प्रभावातील मराठा शेतकरी कुणबी नोंदीपासून दूर राहिला. परिणामी मराठा शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहिली.
- राम गायकवाड, मराठा सेवा संघ कार्यकर्ता, सोलापूर.


0 Comments