सांगोला तालुक्यात ऐन दिवाळीत चिकमहुदात बिबट्याचे दर्शन;
वाड्या वस्तीवरील शेतकरी बांधवात भीती
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : ऐन दिवाळीच्या काळात चिकमहूद (ता. सांगोला) जवळ देवकाते वस्ती, मोरेवस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे वाड्या वस्त्यांवरील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार केल्याचे नागरिकातून सांगितले जात आहे.
दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सांगोला वन विभागाकडून या परिसरात गस्तही सुरू केली आहे. चिकमहुद ग्रामपंचायतीतर्फे ध्वनीक्षेपकावरून वाड्या वस्त्यावरील शेतकरी बांधव, नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केल्याचे सरपंच शोभा कदम यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यात चिकमहूद परिसरात मोरेवस्ती, कदमवस्ती, पाटीलवस्ती, बंडगरवाडी, मुळेवस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती आहे. दरम्यान कदमवस्ती येथील समाधान कदम व दयानंद कदम या पिता-पुत्रांना दुचाकीच्या प्रकाश झोतात शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास बिबट्याचे दर्शन होताच घाबरुन त्यांनी दुचाकी दुस-या रस्त्याने घराकडे नेली.
त्याचवेळी सतीश देवकते यांच्यासह इतरांनाही हा बिबट्या दिसला. मोटर सायकलचा आवाज, प्रकाश व लोकांच्या गोंधळामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी वन कर्मचारी, वनरक्षक यांच्यासह मोरे वस्तीत जाऊन पाहणी केली. ज्यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिला त्यांच्याशी चर्चा केली. फोटोवरून ही बिबट्याची मादी असण्याची शक्यता असण्याची वर्तवली जात आहे.
चिकमहूद परिसरात मोरे, देवकाते वस्ती परिसरात बिबट्या दिसल्याचे सांगितले जाते. त्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्षदर्शी नागरिकांशी चर्चा केली. मोबाईल वरील फोटो व पायाच्या ठशावरून बिबट्याची मादी असण्याची शक्यता आहे. तरीही खात्री करून वरिष्ठाच्या परवानगीने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल.
- तुकाराम जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगोला
0 Comments