''काय झाडी...काय डोंगार'फेम शहाजीबापू भावकीतून मिळालेले चॅलेंज परतवून लावणार?
सांगोला तालुक्यातील चिकमहूद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना या वेळी भावकीतूनच आव्हान देण्यात आले आहे.
आमदार पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात सुभाष भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट शिवसेना आणि शेतकरी
कामगार पक्षाचे पॅनेल मैदानात उतरले आहेत.त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.ग्रामपंचायत निवडणूक ही गावकी आणि भावकीमध्येच लढली जाते.
भावकीतूनच एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानं दिली जातात. त्यानुसार सांगोला तालुक्यातील चिकमहूद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनाही थेट त्यांच्या घरातूनच आव्हान मिळाले आहे.
विशेष म्हणजे २०१२ ते २०१७ ही पंचवार्षिक सोडता चिकमहूद ग्रामपंचायत स्थापनेपासून म्हणजेच १९५१ पासून आतापर्यंत शहाजी पाटील गटाच्या ताब्यात आहे.चिकमहूद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट),
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप यांनी एकत्र येऊन (स्व.) सुभाषनाना पाटील ग्रामविकास आघाडी केली आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे शिवसेना आणि शेकाप यांची तामजाई देवी परिवर्तन ग्रामविकास आघाडी अशी लढत होत आहे.
आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनाना पाटील ग्रामविकास आघाडी पॅनेलमधून आमदार पाटील यांच्या मेहुण्याची पत्नी शोभा सुरेश कदम या सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत.
नातेवाईकच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने शहाजीबापूंनीही आपल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलाच जोर लावला आहे.
शहाजीबापू यांच्या पॅनेलच्या विरोधात त्यांच्याच घरातील सुभाष भोसले यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने आव्हान दिले आहे. भोसले यांच्या पत्नी सुप्रिया भोसले या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत, त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार, हे सांगण्याची कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
शहाजीबापूही भोसले-पाटीलच आहेत. त्यांच्याच भावकीतील सुभाष भोसले यांनी तगडे आव्हान पाटील यांच्यापुढे उभे केले आहे.शोभा कदम यांचे पती सुरेश कदम हे आमदार शहाजी पाटील यांचे मेहुणे असून,
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून ते गावातील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. दुसऱ्या बाजूला विरोधी पॅनेलचे सुभाष भोसले हे नवखे आहेत. येथील शेकापची ताकद प्रभाग एकपुरती मर्यादित आहे, असे सांगितले जाते.
परिवर्तन आघाडीप्रमुख सुभाष भोसले पती-पत्नी यांच्यासह सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी उत्तम भोसले यांच्या घरातील तीन असे पाच उमेदवार दोन घरांतून पॅनेलमध्ये देण्यात आले आहेत.
0 Comments