धक्कादायक प्रकार...बहिणीच्या मदतीने मद्यपी बापाला मुलानेच संपविले!
शिंगणापूरच्या भवानी घाटात फेकला मृतदेह; अपघात दाखविण्याचा प्रयत्न, पण... सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर : मद्यपी वडिलांच्या त्रासाला कंटाळून दिवाळी पाडव्याच्या दिवशीच आई व बहिणीच्या मदतीने मुलाने वडील पांडुरंग चंद्रकांत सावंत यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून खून केला.
त्यानंतर शिंगणापूरजवळील भवानी घाटात दुचाकीसह मृतदेह फेकून दिला. ही बाब तपासातून समोर आली. पोलिसांनी मृताचा मुलगा सूरज सावंत (वय २४) व मुलगी प्रतिक्षा व पत्नी संगीता सावंत यांना अटक केली
असून न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
दिवाळीनिमित्त पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करणारी मुलगी प्रतिक्षा घरी आली होती. मुलीच्या विवाहाच्या दृष्टीने पाहुण्यांकडे बोलणी सुरु होती. सणाच्या दिवशी दारू पिऊन आलेल्या वडिलांचा त्रास सहन न झाल्याने
सोमवारी (ता. १३) संशयित आरोपी सूरज याने वडिलास खोलीत कोंडून लोखंडी खिळीने डोक्यात दोन वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पांडुरंगचा मृत्यू झाला.
काहीवेळाने सूरजने आई व बहिणीच्या मदतीने पिशवीत मृतदेह घातला आणि स्वत:च्या पिकअपमध्ये टाकला. प्रतिक्षाला दुचाकी घेऊन तेथे यायला सांगितले. त्याठिकाणी मृतदेह व दुचाकी टाकली. जेणेकरून अपघातात वडिलांचा मृत्यू झाल्याचे लोकांना वाटेल,
असा त्यांचा समज होता. त्याठिकाणी व्यायामासाठी आलेल्या तरुणांना बुधवारी (ता. १५) दुचाकी व एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. त्यांनी पोलिसांना खबर केली आणि तत्काळ पोलिस पथक तेथे पोचले.
मृतदेह पाहून संशय आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. त्यावेळी मुलानेच वडिलांचा खून केल्याची बाब समोर आली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड यांनी पार पाडली.
गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे करीत आहेत.
मुलाच्या मारहाणीत यापूर्वीही मोडला होता पाय
दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलास मुलगा सूरजने यापूर्वी देखील मारहाण केली होती. त्यावेळी मयत पांडुरंगचा पाय मोडला होता. पांडुरंगच्या त्रासाला कंटाळून घरातील लोकांनीच त्याचा खून केल्याची खबर पोलिसांना खबऱ्यांनी दिली होती.
दुसरीकडे सूरजने घाटातील मृतदेह पाहिल्यावर हा खून नव्हे तर वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांसमोर म्हटले होते. तसेच त्यानंतर सूरजने दुसऱ्याच एका तरुणावर संशय घेतला होता. पोलिसांनी या सर्व बाबींचा काही तासांत उलगडा केला.
१३ तारखेला सूरजचे मोबाईल लोकेशन त्या मृतदेहाच्या ठिकाणी होते ही बाब तपासात समोर आली. अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यावेळी त्याने खुनाची कबुली दिली.
0 Comments