धक्कादायक घटना ... टेस्टी जेवण न बनवल्याने भडकला मुलगा; विळ्याने गळा चिरत आईला संपवलं
ठाण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आईची ‘चविष्ट जेवण न दिल्याने’ भांडण करून हत्या केली.
मुरबाड तालुक्यातील वेळू गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. घरगुती कारणावरून आई आणि मुलामध्ये अनेकदा भांडण होत असे.
एफआयआरचा हवाला देत पोलिसांनी सांगितलं की, रविवारी आरोपीचं त्याच्या आईशी पुन्हा एकदा भांडण झालं. मुलाने तक्रार केली की आई त्याच्यासाठी चवदार जेवण बनवत नाही.
अधिकाऱ्याने सांगितलं की, रागाच्या भरात आरोपीने त्याच्या आईच्या मानेवर विळ्याने हल्ला केला, ज्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर आरोपीनी झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्या.
नातेवाइकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ते म्हणाले की, सोमवारी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments