खा.निंबाळकर लागले कामाला..द्राक्ष उत्पादकांना दिला दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे गेल्या आठवडाभरात द्राक्ष, डाळिंब यांसह इतर प्रमुख पिकांचे कोट्यवधी
रुपयांचे नुकसान झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली.
खा. निंबाळकर यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत लवकरच शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंब बागा उध्वस्त झाल्या असून भाजीपाला पिके, पावसामुळे सडून गेले आहेत.
यामुळे कोट्यावधींचे नुकसान झाले असून द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परतीच्या पावसाचा तडाखा बसल्याने सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष द्राक्ष बागांची पाहणी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, अतुल पवार , एन वाय भोसले ,लक्ष्मण येलपले,
दुर्योधन हिप्परकर, आदी उपस्थित होते. पाहणीदरम्यान लांबलेला पावसाळा, धुके, अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षांचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.
तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या सूचनाही खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी यावेळी कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
चौकट
अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकुण पाहणीसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी हळहळले.
यंदा नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्षांसह सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अवकाळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा केला.
कर्ज काढून प्रचंड खर्च करून बागा उभ्या केलेल्या आहेत. डोळ्यांदेखत एवढे नुकसान शेतकऱ्यांना सहन होण्यापलीकडचे आहे. अशावेळी खासदारांनी या शेतकऱ्यांना भेटून दिलासा दिला.
शासनाकडे पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिले.
0 Comments