मोठी बातमी...‘त्या’ मराठा आंदोलकांना मोठा झटका, 11 कोटी रुपये भरावे लागणार!
बीड :- मराठा आरक्षणासाठी गेले काही दिवस मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं,
तर दुसरीकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो लोकांनी साखळी उपोषण सुरु केलं होतं.
सरकार काही भूमिका घेत नव्हतं, त्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक जास्तच आक्रमक झाले होते. दरम्यान, बीड येथे आंदोलकांनी राजकीय नेत्यांच्या घरांवर दगडफेक करत जाळपोळ केली होती. मात्र त्यांनी केलेलं हे कृत्य त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याचं दिसतंय.
नेमकं काय आहे प्रकरण?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड येथे गालबोट लागलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांची घरं पेटवून देण्यात आली होती. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीला देखील आग लावण्यात आली होती.
आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना चांगलंच महागात पडणार असल्याचं दिसतंय, कारण आरोपींनी केलेल्या नुकसानीची भरपाई आता सरकार आंदोलकांकडूनच वसूल करणार असल्याची माहिती आहे.
ही रक्कम थोडीथोडकी नाही तर तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेची जप्त करून वसुली होईल, अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, बीड येथे केलेल्या जाळपोळामध्ये सुमारे 500 हून अधिक आरोपी असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आहे. या पैकी आतापर्यंत 144 अटक करण्यात आली आहे.
त्यामुळे हिंसक आंदोलन करणं मराठा आंदोलकांना चांगलंच महागात पडलं आहे, यापुढे अशा गोष्टी करताना आंदोलकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
0 Comments