लोकसभेसाठी ठाकरे गटाचा परभणीचा उमेदवार ठरला,
माढ्याची उमेदवारीही जवळपास निश्चित!
येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने तयारी सुरू केली असून परभणीसाठीचा उमेदवारही निश्चित केल्याची माहिती आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार बंडू जाधव हेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. तर माढ्याचाही उमेदवार जवळपास निश्चित केला असल्याची माहिती समोर येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. परभणीसाठी विद्यमान खासदार बंडू जाधव हेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाला इंडिया आघाडीमध्ये जागा मिळाल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार उत्तम खंदारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची आज उद्धव ठाकरेंच्यासोबत बैठक झाली आहे. त्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा दोन्ही
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे दिले आदेश देण्यात आले आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
निवडणूका केव्हाही लागतील आणि उमेदवार कोणीही असू द्या, तयारी करा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
शिर्डीचा तिढा कायम
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची यावरून तिढा अद्याप कायम आहे. त्याचसंबंधित शिवसेना भवनवर बैठकही झाली होती. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला
माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिर्डी येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
तसेच आम्हाला आमचं म्हणणं उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडायच आहे. त्यासाठी बबनराव घोलप यांच्यासह आम्हाला 'मातोश्री'वरून उद्धव ठाकरे यांची वेळ द्यावी अशी मागणी स्थानीक पदाधिकाऱ्यांनी सुनील शिंदे यांच्याकडे केली.
0 Comments