नीरा उजवा कालव्याचे पाणी कासाळ ओढ्यात सोडावे -
माजी आमदार दीपक साळुंखे पाटील चिंचोली व तिसंगी तलावही भरून द्यावेत
सांगोला : देवधर, वीर व भाटगर हे तीनही धरणे शंभर टक्के पाण्याने भरली आहेत. या धरणातील येणारे पाणी निरा उजवा कालव्यातून चिकमहुद (ता. सांगोला) येथून कासाळ ओढ्यामधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडून ते पाणी खेडभाळवणी (ता. पंढरपूर) पर्यंत सोडण्यात यावे.
तसेच सांगोला तालुक्यातील चिंचोली व पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावा अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील यांनी केली आहे.
नीरा उजवा कालव्याच्या सांगोला व पंढरपूर कार्यक्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देवधर, वीर व भाटघर ही तीनही धरणे शंभर टक्के पाण्याने भरली
असल्याने मैल ९३ ला त्या धरणातून पूर्ण क्षमतेने (४०० ते ४५० क्विसेसने ) पाण्याचा विसर्ग करून निरा उजवा कालव्यातून चिकमहुद (ता. सांगोला) येथून कासाळ ओढ्यामधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे.
ते पाणी खेडभाळवणी (ता. पंढरपूर) पर्यंत सोडण्यात यावे. त्यामुळे महूद, गार्डी, पळशी, सुफली, उपरी, शेळवे, भंडीशेगाव व खेडभाळवणी या
सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या भाळवणी गटातील या गावांचा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे.
तसेच आत्तापर्यंत सोनके तिसंगी तलाव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदने, आंदोलने, उपोषणे अशा विविध मार्गातून तलावामध्ये पाणी सोडून भरून द्यावे यासाठी आग्रही मागणी केली होती.
त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून सोनकेतील तिसंगी तलाव व सांगोला तालुक्यामध्ये येणारा चिंचोलीतलाव हाही पूर्णपणे पूर्ण क्षमतेने भरून द्यावा. यामुळे सांगोला, चिंचोली, बामणी, एखतपुरचा पुर्वभाग याच्यासह अनेक गावांना याचा फायदा होणार आहे.
0 Comments