डान्सिंगस्टार गौतमी पाटीलचे वडील अत्यंत दयनीय अवस्थेत
धुळे येथे बेशुद्धावस्थेत आढळले!
मराठीतील नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यातील अजळकरनगर भागात बेवारस असल्यासारखे बेशुद्ध अवस्थेत आढळले. शहरातील स्वराज फ़ाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या
कार्यकर्त्यांना एक व्यक्ती या परिसरात बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. कार्यकर्त्यांनी मानवतेच्या भावनेतून त्यांना धुळ्यातील हिरे रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
गौतमीचे वडील रविंद्र पाटील हे ती आणि तिची आई यांच्यापासून वेगळे रहात होते. त्याबाबतची माहिती त्यांनी यापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. रविंद्र पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची ओळख पटविण्यासाठी स्वराज फ़ाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फ़ोटोसह एक संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केला.
त्यानंतर नाशिक येथे रहात असलेल्या त्यांच्या चुलत बहिणीने कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्या स्वत:ही रुग्णालयात आल्या. दरम्यान कार्यकर्त्यांना अनेकांनी फ़ोनवरून ही व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील आहेत अशी माहिती दिली.
मात्र, गौतमी पाटीलने या बाबतीत कार्यकर्त्यांशी अद्याप कोणताही संपर्क साधलेला नाही अशी माहिती कार्यकर्त्यांनी माध्यमांना दिली.
0 Comments