google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... खाकी' वर्दीकडूनच मटका 'ओपन'; महिन्याला १५ कोटींचा झोलझप्पा

Breaking News

मोठी बातमी... खाकी' वर्दीकडूनच मटका 'ओपन'; महिन्याला १५ कोटींचा झोलझप्पा

मोठी बातमी... खाकी' वर्दीकडूनच मटका 'ओपन'; महिन्याला १५ कोटींचा झोलझप्पा


सोलापूर - औद्योगिक विकासाअभावी आधीच बकाल झालेल्या सोलापुरातील गल्ली-बोळात सर्वत्र मटका-जुगाराचे जाळे पसरलेले आहे. हे जाळे एखाद्या मल्टिनॅशनल कंपन्यांच्या जाळ्यांनाही लाजविणारे आहे.

या मटका धंद्यामुळे मजुरी करणाऱ्या असंख्य श्रमिकांचे व कामगारांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

सोलापुरात पसरलंय मटक्याचे जाळे, त्यात पोलिस व राजकारण्यांचे हात होत आहेत काळे, हे उघड गुपित आहे. पोलिस अधून-मधून मटका टपऱ्यांवर लुटुपुटूची कारवाई करतात, त्यानंतर 'पुन्हा येरे माझ्या मागल्या'ची अवस्था होते. 

या शहर परिसरात खाकी वर्दीकडूनच मटका 'ओपन' झाल्याचं मानलं जातंय. 'ओपन', 'क्लोज' अन्‌ 'पाना'त हजारोजणांचे संसार उद्ध्वस्त होताहेत. साधारण महिन्याला १५ कोटीहून अधिक रक्कम सोलापूरकरांच्या खिशातून जातेय, 

एवढा फटका बसतोय.हा आकडा कमीअधिक होऊ शकतो. सोलापूर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तसेच, सोलापूर शहरालगत असलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळून अंदाजे चार हजार टपऱ्या असल्याचे दिसून येते.

'ओपन', 'क्लोज' व 'पाना'च्या स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या या मटका धंद्यात दररोज ४० ते ५० लाखांची म्हणजे महिन्याला अंदाजे १५ कोटी रुपयांची उलाढाल होते. 

कमीत कमी पैशातही मटका लावण्याची सुविधा असल्यामुळे मजुरी करणारे श्रमिक, कामगार व काही भरकटलेले मध्यमवर्गीय तरुणही मटका खेळत असतात. चुकून कधीतरी मटका लागतो व चांगली रक्कम खेळणाऱ्याच्या हाती लागते.

त्यामुळे मटका क्षेत्रात उपलब्ध असलेल्या व पूर्वी लागून गेलेल्या आकड्यांचा चार्ट पाहून गणिती तज्ज्ञाच्या थाटात आकडेमोड करून असंख्य मटकाबहाद्दर आकडे लावत असतात. परंतु सहजासहजी लागत नाही मटका, त्यातून लावणाऱ्यांच्या खिशाला बसतोय

 फटका. 'ओपन' जेऊ देईना व 'क्लोज' झोपू देईना, अशी अवस्था असलेल्या व मटक्याचे व्यसन लागलेल्या असंख्य लोकांचे संसार त्यामुळे उद्ध्वस्त झाले. परंतु आपले उखळ पांढरे करून घेण्यात रमलेल्या राजकीय नेत्यांना व पोलिसांना त्याबद्दल 'ना खंत ना खेद'!

लुटुपुटू अन् मॅनेज कारवाई !

वरिष्ठांकडून आदेश आल्यावर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना मटका धंद्यांवर धाडी घालाव्या लागतात. अशावेळी पोलिस निरीक्षकांचा वसूलदार त्या भागातील स्थानिक 'मटका किंग'ला गाठून आम्हाला मटक्याच्या १५ केसेस हव्या असल्याचे सांगतो.

अर्थात या केसेसचे प्रमाण कमी-जास्त असू शकते. तो मटका किंग हा संदेश मटका बुकींना पाठवितो. त्यानंतर मटका केंद्रावरील मोठी रक्कम 'मटका किंग'कडे पाठविली जाते. 

त्यानंतर एक-एक पोलिस मटका केंद्रावर जातो. येथील मटका घेणारा बुकी आपण होऊन नाममात्र रक्कम व आकड्यांच्या चिठ्ठ्यांसह स्वतःला पोलिसांच्या हवाली करतात. त्यांना कोर्टात उभे केल्यानंतर 'मटका किंग' त्यांच्या वकिलाची सोय करतो व त्यांना जामिनावर सोडवून आणतो.

क्वचितप्रसंगी अधिक हप्त्यासाठी पोलिस अधिकारी आपल्या पोलिसांकरवी छापे घालतात. याशिवाय, पोलिस खात्यातील अंतर्गत राजकारणातून एखाद्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला हैराण करण्यासाठी आयुक्तालयातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी परस्पर मटका बुकींवर छापे घालतात.

 हे वास्तव असल्याचा बोलबाला आहे. कोणत्याही कारणाने का होईना, मटका बुकींवर छापे घातल्यानंतर पोलिस फक्त मटका घेणाऱ्या बुकींवर कारवाई करतात, स्थानिक मटका किंगपर्यंत सहसा पोचत नाहीत. त्याला अपवाद आहे भाजपचा एक माजी नगरसेवक व कुप्रसिद्ध 'मटका किंग'.

Post a Comment

0 Comments