शासन आपल्या दारी, सांगोल्यात अधिकारी मात्र प्रभारी लोकप्रतिनिधी नाही,
अधिकारी नाही आम्ही करायचं तरी काय ?'ना तहसीलदार, ना मुख्याधिकारी सांगोल्याचा कारभार चालतो रामभरोसे'
सांगोला - सांगोला तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत सध्या तालुक्यात तहसीलदार व मुख्याधिकारी पदे रिक्त आहेत. तालुक्यात 'ना तहसीलदार, ना मुख्याधिकारी कारभार चालतो रामभरोसे' अशी अवस्था झाली आहे.
सांगल्याचे तहसीलदार संजय खडतरे हे सेवानिवृत्त झाले आहेत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांची बदली झाली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात दोन प्रमुख विभागांचे प्रमुखच नाहीत अशी अवस्था झाली आहे.
एकीकडे निवडणुका नसल्याने पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष हे राजकीय कारभारही अद्यापही निवडले गेले नाही त्यामुळे सर्वच सत्तास्थाने अधिकाऱ्यांच्या हाती आली आहेत. सांगोला तालुक्यात सरासरीच्या फक्त 55 टक्केच पाऊस झाला आहे. तालुक्यात दुष्काळसुदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील 81 गावची शिरभावी पाणीपुरवठा योजना पंढरपूर येथील पाण्याअभावी बंद असल्याने अनेक गावांच्या पिण्याची पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. तालुक्यात सध्या महिना-दीड महिना पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे.
त्यातच पाणीटंचाईमुळे पाच गावांना 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा-पाण्यामुळे मोठी दाहकता निर्माण होणार आहे. अशा टंचाई काळात तालुक्यातील दोन विभागाचे प्रमुख नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
लोकप्रतिनिधी नाही, अधिकारी नाही आम्ही करायचं तरी काय ? -
तालुक्यात तहसीलदार व मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक निर्णय वेळेवर होत नाही. सांगोला शहरात चार ते पाच दिवसानंतर पाणी येते. हे पाणीही कमी दाबाने व कमी वेळेसाठी येत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत मुख्याधिकारीच नसल्याने इतर अधिकारी फक्त चालढकल करायचे काम करीत असतात. अशा टंचाई सदृश्य परिस्थितीत आम्ही करायचे तरी काय ? असा सवाल नागरिक करीत आहेत.
पाणीटंचाई आढावा बैठकीतही झाली चर्चा -
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. यावेळी सांगोला शहरातील पाणीटंचाईबाबत तीव्र भावना नागरिकांनी लोकप्रतिनिधी समोर व्यक्त केल्या.
यावेळी तालुक्याला तहसीलदार व मुख्याधिकारी नसल्याने येणाऱ्या अडचणी पाढात वाचला. तहसीलदार व मुख्याधिकारी तालुक्याला लवकर मिळावेत असेही नागरिकांनी या बैठकीत सांगितले.
शासन आपल्या दारी, सांगोल्यात अधिकारी मात्र प्रभारी
राज्य शासनाकडून सध्या शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये प्रभावीपणे राबविला जात आहे. या अभियानात खुद्द मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे सहभागी होऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावताना दिसत आहे. मात्र सांगोला तालुक्यात तहसीलदार, मुख्याधिकारी,
गटशिक्षणाधिकारी हे प्रमुख पदाधिकारीच नसल्यामुळे या विभागाचा कारभार मात्र प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवला आहे. त्यामुळे या टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये राज्यात 'शासन आपल्या दारी तर सांगोल्यात अधिकारी मात्र प्रभारी' अशी अवस्था निर्माण झाली आहे.



0 Comments