अमृत कलश! सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून
माती जाणार दिल्लीला; 'मेरी मिट्टी, मेरा देश' महोत्सवांतर्गत उपक्रम
आझादी का अमृत महोत्सव, स्वच्छता ही सेवा व ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये उद्या मंगळवारी दि.२६ सप्टेंबर रोजी ‘अमृत कलश’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींमधील माती दिल्लीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत कलश मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे
या यात्रेतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता संदेश, घोषवाक्ये, जल प्रदूषण, ओला व सुका कचऱ्यासाठी कचराकुंडी ठेवणे,
अमृत कलशसाठी प्रत्येक घरातून माती संकलन करणे, पंचप्राण शपथ, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा शपथ, कचरा गोळा करणे असे विविध उपक्रम राबवून कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या कलशामधून प्रत्येक गावातील माती जिल्हास्तरावर संकलित केली जाणार आहे. ही माती एकत्रित करून एका कलशमध्ये भरून मंत्रालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई मंत्रालयातून ही माती दिल्लीला पाठवली जाणार आहे.
दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या अमृत कलशमध्ये ही माती मिसळली जाणार आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाने देशभरातील प्रत्येक गावातून माती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे.
त्यात सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती मिसळली जाणार आहे. यासाठी गाव, तालुका व जिल्हास्तरावर कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
‘माझी वसुंधरा ‘ला गती
‘माझी वसुंधरा’ उपक्रमात दक्षिण सोलापुरातील मंद्रुप ग्रामपंचायतीने सलग दोन वर्ष कोटीचे बक्षीस मिळवले आहे.. जिल्ह्यात यंदाही या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सुमारे २५ ग्रामपंचायतीनी या स्पर्धेत भाग घेतला आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9503487812
0 Comments