सांगोल्याच्या प्रा.डॉ. मनोजकुमार माने यांनी गवताच्या
काडीवर संशोधन करून उभारला जैविक इंधन उद्योग
शेतात जिरॅनियम गवताच्या जळत्या काडीतून निघालेल्या निळ्या ज्योतीचा अभ्यास व संशोधन करत सांगोल्याचे प्रा. डॉ. मनोजकुमार माने यांनी जैविक इंधन निर्मितीचा उद्योग उभारला आहे.इंधन संशोधनात सांगोल्याच्या प्रा.डॉ. मनोजकुमार माने यांनी आकाशाला गवसणी घातली आहे.
एलपीजी वायूला श्री. माने यांनी नैसर्गिक पर्याय दिला आहे. नैसर्गिक व पर्यावरण पूरक इंधन निर्मितीचा माने यांचा प्रयोग यशस्वी आणि तितकाच प्रेरणादायी ठरणारा आहे. सांगोला येथील प्रा. डॉ. मनोजकुमार माने हे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
त्यांचे वडील तात्यासाहेब माने यांनी त्यांना शेतात जनावरे व चोरांपासून नुकसान न होणारे काही पीक घेता येईल, का याची विचारणा केली. प्रा. माने यांनी अभ्यास करून जिरॅनियम या औषधी तेल देणाऱ्या गवताची लागवडीसाठी निवड केली.
एकेदिवशी शेतातील गवताच्या काड्या जळत असताना प्रा.डॉ. माने यांनी त्यातून निळी ज्योत निघत असल्याचे पाहून त्यांनी संशोधन करण्याचे ठरवले. त्यांनी वाळलेल्या गवत काडीची (ॲग्रो वेस्ट) ज्वलन ऊर्जेची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेची मदत घेतली.
प्रयोगशाळेने या जैविक कचरा (ॲग्रोवेस्ट)ची ज्वलन उर्जामूल्य (कॅलरीफीक व्हॅल्यू) ५५०० असल्याचे कळवले. त्याचा अर्थ हा वाया जाणारा काडीकचरा उत्तम जैविक इंधन निर्मितीचा स्रोत ठरू शकतो हे त्यांच्या लक्षात आले.
मग त्यांनी जैविक इंधन निर्मितीसाठी माने ॲग्रो इंडस्ट्री नावाने उद्योगाची स्थापना करून यंत्रसामग्री मागवीत उत्पादन सुरु केले. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतातील काडीकचरा (ॲग्रोवेस्ट) विकत घेण्यास सुरवात केली.
त्यामुळे शेतकऱ्यांना देखील उत्पन्न मिळू लागले. पण उत्पादन विकायचे तर हे इंधनासोबत योग्य पध्दतीचे स्टोव्ह देखील हवेत. मग त्यांनी एका स्टोव्ह निर्मात्याशी करार करून जैविक इंधन व स्टोव्ह एकत्रितपणे बाजारात उपलब्ध केले.
दरम्यान, शासनाने कोळसा व लाकडापासून ऊर्जा निर्मितीवर बंधने आणत इतर नैसर्गिक ऊर्जा वापरण्याचे धोरण घेतल्याने त्याचा लाभ झाला. तसेच पर्यायी ऊर्जा वापराला वाढता प्रतिसाद मिळाला.
कारण त्याचा खर्च हा एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत कमी असल्याने मागणी वाढली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या उद्यमने त्याची दखल घेऊन त्यांच्या उद्योगाचा गौरव केला आहे.
ठळक बाबी
- जळत्या गवताच्या काडीतून सुचली बायोमास उत्पादनांची कल्पना
- तेल काढून उरलेला जिरॅनियम
गवताच्या काड्या, बगॅस, गव्हाचे बुस्कट, बुरकुंडा आदीचा उपयोग
- बायोमास व स्टोव्हची एकत्रित विक्री
- एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत नैसर्गिक पर्याय
स्टार्टअपमधून विकसित केलेली मूल्ये
- नैसर्गिक इंधनाचा सर्वात स्वस्त पर्याय देण्याचा प्रयत्न
- शेतातील काडीकचऱ्यापासून जैविक इंधन निर्मिती
- शेतकऱ्याला काडीकचऱ्यातून उत्पन्न मिळवून देण्याचे कार्य
- नैसर्गिक व पर्यावरण पूरक इंधन निर्मिती
- कोळसा, लाकूड, एलपीजी इंधनाला स्वस्त पर्याय,
आपल्या देशात जिरॅनियम, मेंथॉल व लेमनग्रास या गवतापासून तयार केलेली औषधी तेल आयात करावे लागते म्हणून या गवताचे उत्पादन घेतले. नंतर शिल्लक काडीकचऱ्यापासून जैविक इंधन निर्मितीने अर्थकारण भक्कम झाले.
- प्रा. मनोजकुमार माने, सांगोला


0 Comments