सोलापूर जिल्ह्यात आता एकच विरोधी पक्षाचा आमदार! २ खासदार
अन् ११ आमदारांविरुद्ध आता एकट्या प्रणिती शिंदेंची फाईट
सोलापूर : जिल्ह्यातील एकूण ११ आमदार आणि दोन खासदारांविरूद्ध आता विरोधी पक्षाच्या म्हणजेच काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांची टक्कर असणार आहे. जिल्ह्यात अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे.
आता आमदार प्रणिती शिंदे पक्षनिष्ठा जपून प्रभावीपणे त्या सर्वांशी लढणार की खासदारकीला भाजपच्या गोटात जाणार,
याचा तर्कवितर्क लावला जात आहे. राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपने एकमेकांवर टोकाची टीका केली,
पण शेवटी तिन्ही पक्षातील नेते सत्तेसाठी एकमेकांसोबत मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे सध्यातरी कोणी भाजपसह सत्तेतील इतरांवर टीका करतेय म्हणून तो पक्षांतर करणार नाही, हा दावा अचूक ठरणार नाही.
जिल्ह्यातील शहर मध्य विधानसभा वगळता उर्वरित दहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आता सत्तेत सहभागी आहेत.
त्यात माढ्याचे बबनराव शिंदे हेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता.
त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवारांसोबत ते गेले होते. पण, आता त्यांनी सावध भूमिका घेतली असून सध्या ते तटस्थ असल्याची स्थिती आहे.
दरम्यान, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे आमदार राम सातपुते, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे,
दक्षिण सोलापूरचे सुभाष देशमुख, अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी, शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख हे भाजपचेच असून आता मोहोळचे आमदार यशवंत माने हेही अजित पवारांच्या गटासोबत आहेत.
दुसरीकडे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हेही सत्तेत आहेत.
जिल्ह्यात आता काँग्रेसचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्या सर्वांशी आता आमदार प्रणिती शिंदे यांना एकट्याला लढावे लागणार आहे.
मोहोळमध्ये आता विरोधी चेहरा कोण?
माजी आमदार राजन पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील व युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष अंजिक्यराणा पाटील हेही अजित पवार गटासोबत आहेत.
त्यांच्या जोडीला विद्यमान आमदार यशवंत माने देखील गेले आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून तालुक्यात राजन पाटलांचेच वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप, शिवसेना आहे.
पण, आता हे तिन्ही पक्ष सत्तेत असल्याने या मतदारसंघात विरोधक कोण, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा, सांगोला व शहर मध्य वगळता अन्य विधानसभा कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
'शहर मध्य'मध्ये प्रणिती शिंदेंची कोंडी शहर मध्ये या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.
त्यांना राष्ट्रवादीसह विरोधी पक्षातील असंतुष्ट कार्यकर्त्यांची देखील मदत झाली.
पण, या मतदारसंघातील एमआयएमचे तौफिक शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून आता ते अजित पवार गटासोबत जाण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे महेश कोठेही त्याच वाटेवर जातील, अशी चर्चा आहे. भाजप व शिंदे सेनेचा गट या मतदारसंघात कार्यरत आहे.
एमआयएमचे फारुक शाब्दी पुन्हा या मतदारसंघात निवडणूक लढवतील आणि आडम मास्तरांची भूमिका वेगळीच असणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांना पुढील आव्हान कडवे असणार आहे. त्यामुळे आहे, त्याच पक्षातून त्या आमदारकी लढवतील की काँग्रेसच्या खासदारकीच्या उमेदवार असतील,
असाही तर्कवितर्क लावला जात आहे. पण, त्या भाजपमध्ये प्रवेश करून सोलापूर लोकसभेच्या खासदार होतील, अशीही चर्चा आहे. आता आगामी काळच ठरवेल कोण कोणत्या पक्षातून लढेल.


0 Comments