सोलापूर जिल्ह्यातील गुरुजीही देणार आता विद्यार्थ्यांसारखी परीक्षा;
बुद्धीमान शिक्षकांना मिळणार संधी; 'ही' कागदपत्रे आवश्यक
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात केंद्रप्रमुखांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या ९९ जागा भरण्यात येणार आहेत.यासाठीची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
केंद्रप्रमुख पदासाठी फक्त संबंधित जिल्हा परिषदमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक अर्ज करण्यास पात्र आहेत.
संबंधित जिल्हा परिषदेव्यतिरिक्त अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका, खासगी संस्थामधील शिक्षक कर्मचारी हे या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी १९९४ मध्ये केंद्रप्रमुखाचे पद निर्माण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांना २,३८४ रिक्त केंद्रप्रमुख पदांवर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षांद्वारे नियुक्ती
देण्यासाठी 'केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३' या परीक्षेचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आले आहे.
ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करण्यासाठी मुदत ही ६ जून २०२३ ते १५ जून २०२३ अशी आहे. या परीक्षेमुळे बुद्धीमान शिक्षकांना संधी मिळेल असे शिक्षक सहकार संघटनेचे सरचिटणीस नीलेश देशमुख म्हणाले.
केंद्रप्रमुखांचं काम काय?
जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रप्रमुखांच्या अंतर्गत १३ ते १६ शाळा येतात. केंद्र व्यवस्थापक त्यांच्या व्यवसायाच्या दैनंदिन व्यावसायिक कामकाजाचे नियोजन, आयोजन आणि समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
अशी असेल परीक्षा
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होईल. परीक्षा २०० गुणांची असेल. त्यात दोन विभाग असतील. पहिल्या विभागात बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता हे घटक असतील. दुसऱ्या विभागात नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हे असेल.
शिक्षकांतनाराजी
राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये २ हजार ३८४ केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पण, या पदासाठी अर्ज करण्यास ५० वर्षे वयाची अट घातल्यामुळे अनेक शिक्षक परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार आहेत. ५० वर्षावरील शिक्षकांना परीक्षेची संधी मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
अर्जासोबत दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईज फोटो आदी आवश्यक आहे.


0 Comments