google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या 'चिमणी'वर आज हातोडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त; 200 हून अधिक सभासदांना घेतलं ताब्यात

Breaking News

सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या 'चिमणी'वर आज हातोडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त; 200 हून अधिक सभासदांना घेतलं ताब्यात

मोठी बातमी.. सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या 'चिमणी'वर आज हातोडा;


पोलिसांचा मोठा बंदोबस्त; 200 हून अधिक सभासदांना घेतलं ताब्यात 

सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आजपासून सुरुवात होणार झाली.

दरम्यान, चिमणी पाडकामपूर्वी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा कारखान्यात दाखल झाला आहे. एक किलोमीटर परिघात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.

रात्रीपासूनच कारखान्यात बसलेल्या शेतकरी सभासद आणि कारखान्याच्या कामगारांना पोलिसांनी पहाटेपासून ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास दोनशे हून अधिक कामगार आणि सभासदांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या एक किलोमीटर परिघात कालपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या माध्यमांना देखील पोलिसांनी प्रवेश नाकारला आहे.

दरम्यान, विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. साखर कारखान्याच्या सभासदांनी चिमणी पाडण्यास विरोध केला आहे. त्यांच्या या विरोधाला आता प्रशासन नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

सोलापुरातील होटगी रस्त्यावर 350 एकर क्षेत्रात विमानतळ अस्तित्वात आहे. त्यालगतच सिद्धेश्वर साखर कारखाना आहे. सुमारे 50 वर्षांपासून हा कारखाना कार्यरत आहे.

भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळेच विमानसेवा सुरू होऊ शकत नाही. त्यामुळं हा चिमणीचा अडसर दूर करुन सोलापूरची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी केली जात आहे.

90 मीटर उंच असलेल्या चिमणीमुळं विमानसेवा सुरु करण्यात अडथळा येत आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने देखील सिद्धेश्वरची चिमणी यापूर्वीच बेकायदेशीर ठरवली आहे. त्यावर न्यायालयीन लढाई सुरु आहे.

दुसरीकडे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूनेही ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी, सभासद, कारखान्यावर उपजीविका अवलंबून असलेले अन्य घटक रस्त्यावर उतरले आहेत.

2009-10 च्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विमानसेवा सुरू झाली होती. मात्र किंगफिशर कंपनी आर्थिक नुकसानीत आल्याने विमान सेवा बंद पडली आणि तेव्हापासून ही सेवा बंदच आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 2016 साली सोलापूर विमानतळचे नाव उडान योजनेअंतर्गत आले. चाचण्याही झाल्या. यामध्ये अडथळा ठरण्याचं प्रमुख एक कारण सांगितलं गेलं ते म्हणजे विमानतळाजवळ असलेली सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी.

विमानतळापासून जवळ असलेल्या सिध्देश्वर साखर कारखान्याची कोजनरेशन चिमणी ही विमानसेवेत अडथळा ठरेल असा अहवाल देण्यात आल्याने DGCA ने परवानगी नाकारली. 

प्रकरण उच्च न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयात गेलं, चिमणी पाडण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र कोणतं ना कोणतं कारण सांगून हे काम आतापर्यंत तसंच रखडलेलेच आहे.

Post a Comment

0 Comments