खळबळजनक घटना! बेरोजगार तरूणाकडून २८ लाख उकळले;
फसवणूकप्रकरणी वीरशैव शिवाचार्यावर गुन्हा दाखल
स्वतःच्या माध्यमिक शाळेत शिक्षकपदाची नोकरी लावतो म्हणून २८ लाख रूपये घेतले आणि नंतर नोकरी दिली नाही आणि घेतलेली रक्कमही परत केली नाही म्हणून
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील वीरशैव समाजाच्या बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात नागणसूर गावच्याच शांतवीरप्पा शरणप्पा कळसगोड (वय ३२) या फसवणूक झालेल्या बेरोजगार तरूणाने फिर्याद नोंदविली आहे.
फिर्यादीनुसार श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी हे स्वतः अध्यक्ष असलेल्या नागणसूर येथील सीतामाता ज. शेळके प्रशालेत शिक्षकपदाची एक जागा रिक्त
असल्याचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी शांतवीरप्पा कळसगोड यास सांगून शिक्षकपदी नोकरी लावण्याचे आमीष दाखविले होते.
२ एप्रिल २०२२ रोजी यासंदर्भात झालेल्या भेटीत श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींनी शिक्षकाची नोकरी हवी असेल तर २८ लाख रूपये आपणांस द्यावे लागतील, असे स्पष्टपणे सांगितले होते.
एवढी मोठी रक्कम नसल्याची अडचण पुढे केली असता श्रीकंठ शिवाचार्य यांनी शिक्षक होण्यासाठी १५-२० तरूण पैसे देण्यास तयार आहेत. त्यामुळे २८ लाख रूपये दिले तरच नोकरी मिळेल,
असे बजावले.त्यामुळे शांतवीरप्पा याने आपल्या घरची शेतजमीन विकली आणि त्यातून मिळालेले २८ लाख रूपये श्रीकंठ शिवाचार्य यांना २० मे २०२२ रोजी श्रीकंठ शिवाचार्य यांना त्यांच्या मठात नेऊन दिले.
तेव्हा शिक्षक मान्यतेसह इतर कामे पूर्ण करण्याची हमी श्रीकंठ शिवाचार्य यांनी दिली होती. परंतु पुढे ते शिक्षकपदाची नोकरी देण्यास टाळाटाळ करू लागले.
मी नोकरी देऊ शकत नाही.माझ्यावर धर्मसंकट आला आहे, अशी अडचण त्यांनी मांडली. तेव्हा हतबल झालेल्या शांतवीरप्पा याने, मला नोकरीची तीव्र गरज आहे.
शेती विकून मी आपणांस २८ लाख रूपये दिले आहेत. माझा असा गळा कापू नका म्हणून विनवणी केली.परंतु श्रीकंठ शिवाचार्य यांनी नोकरी लावली नाही आणि घेतलेली २८ लाखांची रक्कम तगादा लावूनही परत केली नाही.
यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी शांतवीरप्पा याने पोलिसांत धाव घेतली.नागणसूर बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती
श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांना लिंगायत समाजासह संपूर्ण वीरशैव समाजात मोठा मान आहे. मागील २०१९ सालच्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत ते भाजपकडून उमेदवार म्हणून इच्छूक होते.
त्यावेळी भाजपने गौडगावचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींना उमेदवारी देऊन निवडून आणले होते .
खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा जातीचा दाखला बनावट आणि खोटा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात यापूर्वीच फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात अपिलात प्रलंबित आहे.
0 Comments